प्रेम शोधावया गेले,
विरह आला आयुष्यात ।
आहे शोधणे आम्हाला
नित्य प्रेमा विरहात ।।
प्रेम डोळ्यामध्ये राही
भाव नित्य मनावर ।
मन लागते झुराया,
दुःख होई अनावर ।।
सुखात राहण्या साठी,
प्रेम करणे सतत ।
प्रेमासाठी नित्य व्हावे,
करुणेने ओतप्रोत ।।
वेदनेला नाही सीमा ,
कर्म कुणाला दिसते ।
नाही संपत्ती म्हणून,
मित्र मंडळी तुटते।।
व्देषामागे सारेजण ।
प्रेमा कोणी विचारेना ।
सज्जनांच्या मदतीला
कोणी कुठेच धावेना ।।
प्रेम वात्सल्याची जाण,
जरी नसे सर्वालाही ।
कर्तव्यच प्रेमामध्ये,
हक्क कोसो दूर राही ।।
धन,पैका, नको आम्हां,
प्रेमासाठी द्यावे बळ।
आयतेच नको काही,
नित्य सोसू आम्ही कळ ।।
माणसाने माणसाचे,
नित्य करावे जतन ।
नका समजू कुणाला,
कधी पशूच्या समान ।।
शेतकरी बळीराजा,
राब राबतो शेतात ।
घाम गाऴतो म्हणून,
सारे राहती सुखात ।।
दिसे साजरी बकुळी
आमच्याही अंगणात ।
भेदाभेद नाही मनी,
रंगीबेरंगी फुलात ।।
हात जोडून विनंती,
हक्क सर्वांनी मागावे !
लाचारीने जगू नये,
माया सारखे जगावे !!
..
©️®️ माया दामोदर
शेगांव जि.बुलढाणा -444203
मो.888674261