♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


स्नेहल साखरकर

करिअर घडविताना
मुलांना समजून घ्या.....


बाळ जन्माला आल्यापासून त्याच्या संगोपनाची आई वडिलांची धावपळ सुरू होते. जन्माला आलेला बाळ लगेच बोलायला लागत नाही. पण, त्याला काय हवे, काय नको हे मात्र आईला तो रडला की लगेच कळतं. थोडा मोठा होईपर्यंत चालायला बोलायला आई-वडील शिकवतात. पण, शाळेत जायला लागला की शाळेच्या बाई अभ्यास शिकवतात. दहावी परिक्षेपर्यंत सुरू असते. दहावीनंतर करियरच्या वाटा शोधताना गोंधळ होतो. वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाने इंजिनिअर व्हावं आणि आईचा हट्ट डॉक्‍टर व्हावं. मुलांना न झेपण्या-या पाय-या चढण्यासाठी पालकांचा अट्टहास सुरू होतो. शेजारच्या काकांचा मुलगा इंजिनिअर झाला म्हणून माझ्या ही मुलाने त्याच क्षेत्रात जाण्याचा हेवा, कधी कधी महागातही पडू शकतो. मग, तणाव, अपयश या कारणांमुळे तो मागे पडतो. नैराश्‍य हाती लागतं. आत्महत्येसारखा विचार त्याच्या डोक्‍यात येतो. मुलांची मानसिक स्थिती नसतानाही पालक लाखो रुपये शिक्षणावर खर्च करतात. पण, मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करीत नाहीत.

सचिनने दहावी-बारावीत बऱ्यापैकी मार्क मिळविले. त्यामुळे घरी आनंद पारावर झाला होता. मुलगा इंजिनिअर व्हावा, अशी त्याच्या बाबांची इच्छा होती. पण, तो खरोखरच त्या अभ्यासक्रमात तग धरेल काय, असा प्रश्‍न आईच्या मनात सतावत होता. पण, बाबांपुढे कुणाचेच चालत नव्हते. तू उद्या शहरात जा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश पत्र घेऊन ये, असा वटहुकूम बाबांनी सचिनकडे सोडला. सचिनला कळेनासे झाले होते. तशी त्याच्या इच्छा चित्रकलेकडे होती. चित्र काढून काय करिअर घडविणार, कोण तुझी चित्रे खरेदी करणार आणि पैसा तरी मिळणार का, अशी अनेक प्रश्न बाबांनी रागात केली. त्यामुळे सचिन मुकाट्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात गेला. प्रवेशाची माहिती घेतली. रीतसर लाख रुपये डोनेशन भरून त्यानं प्रवेश घेतला. कॉलेजचा पहिला दिवस उजाडला. तिथे नवी मित्रे मिळाली. पण, सचिन तिथे रमला नव्हता. पाच -सहा महिने कशीतरी निघून गेली. पहिल्या सत्रातील परीक्षा सुरू झाल्या. त्याच मन रमत नव्हतं. त्याला रडू येत होतं आणि रागही. मनात भावनांचा कल्लोळ सुरू होता. पण, बोलणार कुणाकडे? घरी बाबा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आईजवळ बोलून फायदा नव्हता. परीक्षेचा निकाल हाती आला. मार्क बघून बाबांचा राग अनावर झाला. मुर्खा, काय दिवे लावलेत. इतके पैसे खर्च केले आणि तू इतके कमी मार्क घेतलास. बोलणी, शिवी खात सचिनने आईच्या पदारामागे आधार घेतला. पुढील दोन - तीन महिने निघून गेले. मित्रांच्या सहवासात रमला. पण, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सवय रुचली. सिगारेट, दारू, गांजा, हुक्का आणि नियमित पार्ट्यांमुळे त्याला मित्रांची संगत लागली. यामुळेच त्याच्या अभ्यासाची सवय तुडली, हे त्याला माहीत होतं. पण आता करायचं काय? त्याला काहीच सुचत नव्हतं. शेवटची परीक्षा जवळ आली. घरी बाबांचा धाक. परीक्षा कशीबशी दिली. पण, तो त्यात नापास झाला. सगळं संपलं आता. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागले. मठ्ठ आहोत. इतर लोकांच्या सोबत राहण्याची सुद्धा आपली लायकी नाही, आपल्या जगण्याला अर्थ नाही, आपण कोणाला तोंडही दाखवू शकत नाही, असे नानाविध विचार त्याच्या मनात येत होते. त्याला मेल्याहूनमेल्या सारखं वाटत होत. त्यानं तो नको तो ग्रह करून घेतले आणि मानसिकरित्या पूर्णता खचला. आत्महत्येसारखा भयानक विचार त्याच्या डोक्‍यात आला. पण, मन मोकळे करीत नव्हता. असेच एकदा त्याने व्हॉट्‌सऍपवर स्टेटस लिहिला, "सर्व संपलं आता'. एका मित्राच्या वाचण्यात हा मॅसेज गेला आणि त्याने लगेच फोन करून त्याची समजूत काढली. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. "आधी शांत हो तू, नापास झालास तो परीक्षेत,आयुष्यात नाहीस. तू परत नव्याने सुरवात कर. हीच बाबा त्याच्या बाबांनाही कळून चुकली आणि ते म्हणाले, बाळा, मी निर्णय घेताना चुकलो म्हणून काय तू शिक्षा देणार आम्हाला! तुझ्या आवडीचं आणि मन रमेल, अशाच अभ्यासक्रमाची निवड कर, त्यातच करिअर कर, आम्ही सोबत आहोत. खचलेला सचिन पुन्हा उभारी घेऊन आला आणि आज तो चित्रकलेच्या छंदातून नामांकित ग्राफिक्‍स डिझायनर आहे.


- स्नेहल दिलीप साखरकर

बेसा, नागपूर