♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


काव्य

* संगी *
तुझ्या एका हाकेवर
चालू लागतात गुरेढोरे
तुझ्या मागे-पुढे.

तू वाजवतोस पाउल
तेव्हा अख्खे गोहन
थांबते तुझ्यापुढे.

केव्हढा हा सन्मान
देतात हे मुके प्राणी
जाणतात तुझ्या काळजाची

युगसाक्षी आदिम वाणी.
यंत्रणा मात्र समजतात
तुला घाण-पाणी.
तुला आठवतो ना तो दिवस


२३ नोव्हेंबर १९९४
न्याय मागण्यासाठी गेले होते
हजारो तुझे सगा-संगी
तुही होतास जिवाच्या आकांताने
खांद्याला खांदा भिडवीत.


आणि इथल्या व्यवस्थेने
तुझ्या डोळ्यादेखत
कसे पिचकलून मारले
११४ सगा-संगी.
तेव्हापासून तू
किती मुका-मुका झालास आतून
तडफतोड, संतापतोस
आतल्या आत
व्यवस्था 'जैसे थे' आहे अजूनही.

गोधन पूजेत नाचणारे घुंगरू
अरे आतातरी फेकून दे
गोवारींच्या आक्रंदनाने
आकाश-पाताळ थरथरू दे.
वाजव ना मरू ढोल-डफरी संगी
हो अन्यायाशी आरपार संगी.
- माणिक गेडाम, गोंदिया.
(मोबा.क्र.9561689199)

**********************************************

स्वराज हवे तर...
विकास आणि समृद्धी हे,
दोन राजकारणी अपत्य...
बिन बुडाचे हे गाडगे आहे,
यात नाहीच कसले सत्य...

आधी पोटोबा साधणारे,
उरले नेता आणि भक्त...
लाळचाटू मतदारांनी देश,
काय होईल भ्रष्टाचार मुक्त...?

रक्षक झाले भक्षक आता,
कुणात दिसत नाही शिस्त...
भोग, विलासी, साधू बाबा,
आहेत कंचन, कायेत मस्त...

उजेडात होतात होम, हवन,
अंधारात चाले काळे कृत्य...
कथनी करनी जेवढी काळी,
तेवढाच होतो सत्कार नित्य..

स्वराज्य हवे असेल तर आता,
पेटवा देशभक्तिच्या मशाली...
अन्यथा नेता, बाबा, संधी साधू,
देशाची नक्की लावणार बोली...

मंदिर, मज्जिद जात, पात हेच,
आमच्या विनाशाचे कारण...
वेळ आली आहे करा हो आता,
या सांप्रदायीक विचारांचे दहन...
- सुनील पाटोळे

**********************************************

दीपावलीच्या आनंदाचे

लक्ष लक्ष दीप दीपावलीचे
गीत गाती सोनेरी प्रीतीचे
सप्त सूर सुखाचे
सप्त रंग प्रकाशाचे
दीपावलीच्या आनंदाचे ....

झुळझुळणारा शीतल वारा
आकाशी लखलखती चांदणी
लुकलुकत्या सुवर्ण दीपकळ्या
अनंत दीप पाजळले अंगणी
घर घर हसरे स्वागत उत्सवाचे
दीपावलीच्या आनंदाचे ...

पहाटेचा मधूर नादस्वर ओंकार
आमोद अनुप आत्मानंद महान
सुमधूर सुबोल दीपावली मिलन
लाभले सारे आनंद समाधान
घर घर हसरे आशिष शुभेच्छांचे

दीपावलीच्या आनंदाचे...
सुवर्ण प्रकाश स्वर्ण वैभव
लक्ष लक्ष दीप लखलखती
दीपावलीला लक्ष्मी अवतरली
आकाशातून अवनीवरती
घर घर हसरे संपन्नचे समृद्धीचे
दीपावलीच्या आनंदाचे....

- मीना खोंड

**********************************************
*ओल टिकवली पाहिजे*
*******************

कुलरसमोर बसून
थंडगार पाणी पिताना
टी व्हीच्या भल्यामोठ्या स्क्रीनवर
कोरड्याठण्ण काळजानं
आपण बघत असतो-
'पाण्यासाठी पायपीट',
'रात्रभर जागवते पाणी!',
'पाण्यामुळे विभागलं गाव!'
एक बातमी म्हणून.

प्रत्येकाला आपल्या हिश्शाचा पाऊस
जिरवता आला जमिनीत तर ! नक्कीच पान्हावतील
आटत चाललेले झरे
भेगाळल्या भूईलाही पाझर फुटून
वाढेल,उचंबळून येईल पाण्याची पातळी
ओलीच्या दिशेनं

अन्यथा,रात्रभर जागवेल पाणी !
जीवाभावाचं गाव विभागेल पाणी !!

थोडक्यात-थेबन् थेंब देऊनही
आटत चाललेलं पाणी
वाचवलं पाहिजे
ओल टिकवली पाहिजे
जमिनीतली
आणि काळजातलीही !

-संघमित्रा खंडारे,
साई नगर,दर्यापूर
अमरावती
४४४८०३
dnyaneshpriya@gmail.com



*भविष्यासाठी*
**************
लँपटॉपचे लोढणे पाठीवर मिरवावे
लंगोटी साप्ताहिकांना
शे-पाचशे देऊन
स्वत:च्या कवितांवर
विशेषांक संपादित करावेत
लाईफ-टाईम बायोडाटा असलेला पेनड्राईव्ह
कमरेला सतत लटकवत ठेवावा
वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागाच्या
सातत्याने संपर्कात रहावे
माणसांशी संवाद तुटला तरी चालेल...
आंतर्राष्ट्रीय विषयांचे सदोदित करावे
चर्वितचर्वण ख-र्यासारखे...
दिवाळी अंकासह वाङ्मयीन नियतकालीकांना
वर्गणीसह घालावेत कवितांचे रतिब
वाङ्मयीन पुरस्कार सरसकट आपल्याच नावावर
लागण्याची घ्यावी तसदी
त्यासाठी राजाश्रयाचा पदर
ढळू न द्यावा डोईवरुन
स्वतःच्या निर्मितीवर स्वतःच करावे
वैश्विक भाष्य
अन् धाडून द्यावे
प्रसिदाधीला दुस-यांच्या नावावर
एम.फील.,पी.एच.डी साठी
स्वत:चेच विषय द्यावेत संशोधनासाठी
भवतिलच्या बह्याड बेलण्यांना...
ग्रंथालयात बसून विविध भाषेतील
प्रतिभावंतांच्या पुस्तकातील वेचाव्यात
लघुत्तम व महत्तम प्रतिमा
आणि त्यांची करावी साखरपेरणी
आपल्या बेजान कवितेत
मातब्बर लेखकांच्या समवेत फोटो
काढून घ्यावेत
त्यांच्या मरणोत्तर मोठेपणा मिरवण्यासाठी
भविष्यितले भांडवल म्हणून...
अभ्यासक्रमात कविता लावण्यासाठी
सलगी वाढवावी संपादक मंडळाशी
आयटम गर्ल राखी सावंतसारखे
उपरोक्त आयटम उभे करावेत
भविष्यासाठी
जर तुला महाकवी व्हायचे असेल तर...

अजय कृ.खडसे
१०/अ कॉटनग्रीन सोसायटी
शेगाव नाका,
अमरावती