♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


देवनाथ गंडाटे

आडनावाचे_नामकरण

देवनाथ गंडाटे 
बाळ जन्माला आल्यानंतर त्याची ओळख म्हणून नामकरण करण्याची परंपरा आहे. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, वस्तीला, झाडांना नाव नसेल तर त्यांची ओळख पटविणे कठिण होते. म्हणून व्यवहारिक जीवनात नाव अत्यंत महत्वाचे आहे. व्यक्तीच्या नावानंतर आडनाव लिहण्याची प्रथा आहे. पूर्वी आडनाव न लिहता जातीचा उल्लेख असायचा. तेव्हा जातीनेच माणसांची ओळख होती. काळ बदलला आणि जातीऐवजी आडनाव लिहण्याची प्रथा पडली. हे आडनावदेखील गाव, शहर, निसर्गातील विविध वस्तू, झाडे, फुलझाडे, भाजीपाला, संख्या यावरूनच पडलेल्या बहुतांश दिसतात. अनेक आडनाव हे व्यक्तीनामावरूनही दिसतात. अनेकांच्या आडनावातून अर्थबोध होत नसला तरी त्यांचीही आडनावे मजेशीर असतात. वार किंवा कर हा शब्द अनेक नावांना लावून आडनाव तयार झालेली आहेत.

मराठी आडनावात असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से आणि गमतीजमती निर्माण होतात. असेच काही आडनाव संग्रहित करण्यासाठी सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मी आधार घेतला. त्यात तुम्हाला माहित असलेले चवदार आडनाव सांगा? असा पहिला प्रश्‍न केला. तेव्हा शेकडो लोकांनी उत्तरे दिलीत. पुढे दररोज एक प्रश्‍न केला. चार - पाच दिवसात आडनाव या विषयावर माझ्या मित्रबांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला.

गावांच्या नावावरून
पूर्वी आडनाव खूप किचकट होते. ते उच्चारताना किंवा लिहताना अडचण होत असे. म्हणून अनेकांनी जुने बदलून गाव आणि शहराचे नावावरून नवे आडनाव केले. सातारकर, अक्कलकोटे, पुणेकर, नागपूरकर, नागपूरे, भिवापूरकर, चिमूरकर, पैठणकर, एदलाबादकर, कुहीकर, पारशिवनीकर, रामटेके, नरखेडकर, सावरगावकर, राजूरकर, धापूडकर, सावलीकर, उमरेडकर, खापेकर, पवनीकर, वाशिमकर, दार्वेकर, मौदेकर, शिर्डीकर, हिंगणीकर, ठाणेकर, कल्याणकर, कोल्हापूरे, सांगलीकर, शिर्सिकर, आंबावडेकर, चंदनखेडे, वणीकर, भिसिकर, नायगावकर, बारसागडे, व्याहाडकर, पूसदकर, वाकोडीकर, बैतुले, तारसेकर, औरंगाबादकर, दिल्लीकर, धानोरकर, भंडारकर, ब्रह्मपुरीकर, नागभीडकर, नगरकर, धुळेवार, इंदुरकर, पाडगावंकर, काशिकर, शेगांवकर, वसईकर, विसापूरकर, भांदककर, तुमसरकर, मोहाळीकर, आगरे, चांदुरकर, नाशिककर, शिंगणापूरे, पिपंळगावकर, किन्हीकर, जयपूरकर, बल्लारपूरे, केळझरकर, देऊळगावकर, राजगडकर, रायपुरकर, मार्कंडेयवार, रांजणकर, नांदगावकर, नांदेडकर, भूजबळ, अड्याळकर, पूनावाला, लखनवी, वाडीभस्मे, बिडकर यासह अनेक गावांच्या नावावरून आडनाव तयार झालीत आहेत.

जात नव्हे आडनाव
आडनावावरून अनेकांच्या जाती लक्षात येतात. मात्र, काही आडनाव असे आहेत, की जे जातीची नावेदेखील आहेत. सोनार, लोहार, कुंभार, माळी, कोळी, सुतार
तेली, चांभारे, गाडीलोहार, पवार, ब्राम्हणकर, ब्राम्हणे, वाणी, लेवापाटील, गोंधळी, खोत, धोबे, खाटिक, वाढई, मरार, मारवाडी, पारधी, पाटील, जाट, अहिर, कातकरी, राजगोंड, गवळी, गुरव, पासी, उदासी, वाढई, खाती, पद्मशाली यासारखी.

निसर्ग व वनराई
ही पृथ्वी निसर्गाने नटलेली आहे. याच निसर्गाच्या कुशीतील वनराई, पाने, फुले, जल, माती यावरूनही अनेकांची आडनावे आहेत. समुद्रे, झाडे, मोगरे, दगडे, राणे, पाले, पाचोळे, गवते, जंगले, फुलारे, फलके, पिंपळकर, आंबेकर, फुलझेले, फुलमाळी, पानसरे, वनकर, सदफुले, बोरकुटे, वनवे, बनकर, चंदनखेडे, वांढरे, वडस्कर, डोंगरकर
हिवरे, पानपटे, हिवरक, डोंगरदिवे, बागायत, बाग, काटे, फुले, बोरे, देठे, चाफे, झावरे, चावरे, सुर्वे, माडे, ताडे, हिवराळे, पानगे, चिंचोले, सरकटे, सागरे, पर्वते, ढगे,
फुलेकर, वनबुधे, वनदुधे....