♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


अखेरची भेट

लघुकथा : ...
आरुष...पंचविशीतला तरुण...आता पुढे काय,शिक्षण की नोकरी? या विवंचनेत अडकलेला. घरी दोन वेळेच्या जेवणासाठी फार कष्ट होतील एवढी सुद्धा बेताची परिस्थिती नव्हती, पण अवांतर सुखसुविधा कधीही न उपभोगलेला तो. स्वतःचं असं काही त्याच्याजवळ नव्हतंच मुळात. वडिलोपार्जित शेतीचा तुकडा आणि कायमस्वरुपी नोकरी न मिळण्याइतपत शिक्षण पदविका बस्स...एकच गोष्ट होती त्याने स्वतःच्या जोरावर मिळवलेली; ते म्हणजे प्रेम. तो दिसायला काही Dude टाईपचा वगैरे नव्हता पण त्याचा स्वाभिमान नि त्याच्या साधेपणातली Style-Statement चारचौघात उठून दिसेल एवढी पुरेशी. अभ्यासातही जेमतेम. उनाडक्या करण्यात आयुष्य चाललंच होतं आणि एके दिवशी ती त्याला मिळाली; प्रत्युषा...त्याचं जीवन आणखी जोमानं फुलून आलं. Final ला परिक्षेच्या काळात माञ त्याचाही काळ आला, अचानकच तिच्या घरच्यांनी तिचं लग्न उरकलं. मोठी बहीण आणि ती एकत्रच बोहल्यावर चढल्या. तसं त्यांचं प्रस्थंही मोठं होतं, त्यामुळे ती सधन कुटुंबातील सून बनून नांदू लागली.
इकडे माञ आरुष अपार दुःखात बुडाला होता. एखाद्या चिञपटाच्या कथानकासारखे आपले आयुष्य वळण घेत चाललंय हे त्याला विचित्र वाटत होतं. संपूर्ण पाच वर्षांचं त्याचं ते पविञ प्रेम आता कायमचं नेस्तनाबूत झालं होतं. पविञ प्रेम यासाठी की इतर युगलांसारखं त्यांचं प्रेम कधीही शरीरसुखाच्या मागे धावलं नव्हतं.
माणसाला जशी दोन मनं असतात तशी आरुषलाही होती; एक चंचल आणि दुसरे फार सहिष्णू. दिवसेंदिवस चंचल मनावर सहिष्णू मनाचा पगडा पडत चालला होता आणि आता कुठे आरुषच्या जीवनाला स्थिरत्व प्राप्त व्हायला सुरूवात झाली होती. वारंवार तिची facebook profile उघडून बघणं आता बंद झालं होतं. तिचा contact no त्याच्या mobile phone मध्ये होता तसाच होता. कधी कधी अगदीच लांबलचक message टाईप करायचा तो आणि मग delete ची बटन अशी दाबून ठेवायचा की त्याचा संपूर्ण जीवनपट पुसून कोरा केला जातोय जणू. तरीही या इतक्या दिवसांमध्ये त्याने तिला कित्येक good morning आणि good night messages केले होते. रोज नाही पण अधूनमधून. जसं त्याला कळून आलं की reply येणार नाही, तसं त्याचं ते प्रमाणही बरंच कमी झालं.
आरुषचा जन्मही एका सुंदर तारखेला झाला होता, १३/७'तेरा साथ'; आणि अखेर calendar तिथे जाऊन पोहोचले. फार शुभेच्छांचा वर्षाव होईल इतके मिञही नव्हते पण तरीही तो त्यादिवशी चिंब भिजला, अगदी मनसोक्त. प्रत्युषाने त्याचा वाढदिवस अजूनही आठवणीत ठेवला होता. तिच्या शुभेच्छा कानावर पडल्या न पडल्या की आरुष ताडकन भानावर आला. सगळं काही पूर्वीसारखंच भासू लागलं त्याला. Formality म्हणून प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण झाली, पण कुणी कुणाला कुठलंच वचन वगैरे दिलं नाही की आडवळणाला नेणारा प्रतिप्रश्न केला नाही.
अखेरीस झालं...जे व्हायचं नव्हतं तेच झालं. इतके दिवस आतून थबकलेला तो आणखीणच ओसंडून वाहू लागला. काहीतरी फार मोलाचं हरवलेलं आता गवसल्याची अनुभूती त्याला झाली. चंचल मन सहिष्णू मनावर अधिराज्य गाजवू लागलं. त्याचे calls वाढले messages वाढले. आणि एके दिवशी त्याला प्रत्युषाचा call आला, वेळ व ठिकाण सांगून भेट घ्यायचं ठरलं. याचा आनंद आसमंताला जाऊन भिडला होता. कित्येक दिवसांपासून मनाचा कोंडमारा करणारे अनेक प्रश्न त्याला जाळत होते, आता माञ त्याला मोकळे होण्याची संधी मिळणार होती. कपडे कुठले घालावे, इथपासूनचा खोलवर विचार करुन बसला होता तो. पूर्वीसारखं एखादं फूल घेऊन जाण्याचाही मानस होता त्याचा, पण त्याला वेळच नाही मिळाला.
आली....त्या विरहव्याकूळ क्षणांना छेद देणारी भेटीची वेळ जवळ आली आणि त्याचे पाय आपसूकच बागेकडे वळू लागले. चांगल्या तास-दीड तास गप्पा मारायच्या, काहीतरी खात बसायचं म्हणून थोड्या पैशाचीही तजवीज करून निघाला होता तो. बागेत तो वेळेवर पोहोचलाही पण तिला तिथे आधीच बसलेलं बघून थक्क झाला. यापूर्वी एकाही भेटीत वेळेवर न आलेली ती आज चक्क वेळेपूर्वी तिथे हजर होती.आरुषच्या मनाला हायसे वाटले. गुलाबी साडीत आलेली ती जणू अप्सराच भासली त्याला. हा तिच्या जवळ जाऊन बसताच तिने जरासं अंतर राखत स्वतःला बाजूला घेतलं आणि नंतर जे झालं त्याची आरुषने कल्पनाही केली नव्हती. कुणीतरी जवळच्या व्यक्तीने कान पकडून कानठळ्या बसतील एवढ्या मोठ्यानं आपल्याला ओरडावं आणि सारं कळत असूनही आपण हतबल होऊन निमूटपणे ऐकतच राहावं अशी त्याची परिस्थिती.
त्याने रंगवलेल्या क्षणिक स्वप्नांची राखरांगोळी होताना तो स्वतः बघत होता. प्रत्युषा इतक्या आवेशात बोलत होती की शेवटी तिने त्याला पोलिसात देण्याचीही भाषा केली. एवढं सगळं अवघ्या पाच ते दहा मिनिटांत घडलं पण आरुषला ते युगायुगासारखं जाणवत होतं. ती ताडकन उठली आणि तरातरा चालत कारच्या मागच्या सीटवर बसली,ड्रायव्हरला हाताने इशारा केला नि कार क्षणार्धात दृष्टिक्षेपातून गडपही झाली.
आरुषला कळून चुकलं होतं की आपण कितीही वेगाने चाललो किंवा धावलो तरीदेखील त्या कारचा पाठलाग नाही करू शकणार. त्याची संथ पावलं परतीच्या मार्गाने कधीचीच वळली होती पण तेच अंतर जे आता काही वेळापूर्वी तो झपाझप पावलं टाकत पार करून आला होता, परतताना माञ संपता संपत नव्हतं.

Sachin Doijad