♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


कुमार

तुजसाठी जगावे
तुजसाठी मरावे..
आपल्या पश्चातही
किस्से अपुले उरावे....
तुझी प्रीत गर्द सावली
वाळवंटी वादळ मी..
कथा आपली ऐकताना
अश्रूंचे मन गहिवरावे...
- कुमार

 ------------------------------
कुरवाळले जरा मी
या जर्जर जखमांना..
हासली तव आसवे
डोळ्यांतून झरताना...
मी तुजसाठी तळमळतो
व्याकुळ श्वासांप्रमाणे...
भेटण्यास येशील का....?
मृत्यू मजला धरताना...
- कुमार


चल..जगूया पुन्हा..
आसावांच्या सावलीत..
एकमेकांसवे..
तीव्र दुःखांच्या मिठीत..
पुन्हा असा जन्म नाही
मिळेल जेथे प्रीत ही..
ये सामावून घे मज
तुझ्या विरही पोकळीत ..
- कुमार

 **************************
तु माझ्यातच आहेस..
अगदी कणाकणात
प्रत्येक श्वासात..अन्
मंतरलेल्या क्षणांत..
तुझ्या मऊ स्पर्शाने
जखमांची झाली फुले..
वाळवंटी आयुष्यात
जणू रिमझिम बरसात..
- कुमार..
 

 **************************

तु कळलास आम्हां
सारे बोलती मला..
न सरली माझी कधी
मज शोधण्याची शृंखला..
- कुमार..


पुन्हा गुंतून चाललो
का असा तुझ्यात मी..?
तु कस्तुरीसुगंध ...
वेडा पारिजात मी..
रोमरोमाला तुझी
ओढ लागली कशी..?
राहीलो न जरा..
माझिया हातात मी..
- कुमार


एक शब्द माझा
एक तुझा असू दे
संवाद मोजका..
सावळा असू दे..
जे सांगायचे ते
बोल मजपाशी..
अपुल्याच श्वासांचा
सोहळा असू दे..
- कुमार


जेथे भेटलो शेवटी
तेथेच मग भेटू पुन्हा
वेळ काळ तु ठरव
शोधून कालच्या खुणा..
- कुमार
जेथे भेटलो शेवटी
तेथेच मग भेटू पुन्हा
वेळ काळ तु ठरव
शोधून कालच्या खुणा..
- कुमार


कोणा म्हणावे आपले?
सावली देई दगा..
स्तब्ध माझे शब्द अन्
जन्म माझा पोरका..
- कुमार


ये जवळ एकदा..
पुन्हा 'तो' स्पर्श कर
पुन्हा देह होऊ दे..
सुगंधी संगमरवर...
भिजू दे अंतरात्मा..
मिलनाच्या पावसात
विद्युल्लतेसमान तू
काळजात अलगद उतर..
- कुमार..


राधेस पाहिले न
मीरा कधी मिळाली
तुझ्यामुळे मजसाठी
धरणी दिगंत झाली..
तुझ्यासम कोणतीही
मीरा-राधा नाही.....
खोली तुझ्या प्रीतीची
कुणा गाठता न आली...
एक मात्र आहे..
काळ अधुरा पडला
सूर्य कोळसा झाला
गिळून अंधाराच्या मशाली...
- कुमार ..


या वळणावर उभा
जेव्हां स्वतःस पाहतो
जीव जर्जर पातकी
माझा मला धिक्कारतो..
खेळ हा सारा प्रिये
संपणारा न कधी
दूर मी राहूनही
तुझ्या भोवती घोंगावतो..
कळते मज संवेदना
रोमरोमातील तुझी
शृंखलांना मजवरील
विवश मी कुरवाळतो..
- कुमार

जेव्हां तुझ्याशी भेट होईल
प्रश्न तुझे अमाप असतील
मी मात्र गप्पच असेल
माझी उत्तरे लाख नसतील
एकदातरी भेटेन मी
धिक्कारशील तू जरी
उरलेले श्वास माझे
आता कुठे निष्पाप असतील?
- कुमार


जेवढी अधीर तु
मीही तेवढा अधीर
कधी छेदले मला
तुझ्या आठवांचे तीर..
वास्तवात चालले
फसवेच तराणे जूने
चंद्रोदयाने पेटले
माझे अभागी तिमिर..
जीर्ण जाहली अता
काळजाची पुकार
डोळ्यांत दाटले पुन्हा
अथांग दर्याचे नीर..
उदास तु होऊ नको
वाट माझी पाहुनी
नशिबी न थांबणे
मी जन्मीचा राहगीर..
- कुमार


मी जरासा दुर झालो
जरासा मजबूर झालो
तुझ्या पापण्यांत मी
आसवांचा पूर झालो..
कोणत्या कातरवेळी
कोणत्या वेड्या घडीस
शाश्वत माझ्या प्रीतफुला
क्षणात क्षणभंगुर झालो..
- कुमार


पुन्हा तुझ्याशी भेट व्हावी
अन् फुलांना बहर यावा
पुन्हा तुझ्या तारुण्यात
पुरुषार्थ माझा विरघळावा..
- कुमार



ती आजही तशीच आहे
मला मात्र बदलावं लागलं
कोसळलो हजारदा..
स्वतःला उचलावं लागलं..
तिला अलविदा करताना
घन धुमसुन बरसले आत
जड अपराधी पावलांनी
वळून... परतावं लागलं..
- कुमार


पातकी माझा दिलासा
तुझी पवित्र सांत्वना..
घेऊन ओझे एवढे
जाऊ कोणत्या वना..?
- कुमार
 या टोकाला मी...
त्या टोकाला तु राहायचं..
सांग सखे..मग..
एक कसं व्हायचं..?
- कुमार
 शून्यातील मौन माझे
कोंडलेली व्यथा माझी
शब्दांविणा कळली तुला
ती अबोल कथा माझी..
- कुमार

 तुझ्या माझ्या पायवाटा
निघाल्या दाही दिशांना
परतीचा मार्ग नाही..
का कळेना..पावलांना..
- कुमार

काळजाच्या अंतरंगी
कोणता हा खेळ चाले
एकदा चुंबून घे ना..
ओठ ओठाला म्हणाले
- कुमार


तिची कथा होती माझी कथा होती
जरा मनाची अस्वस्थता होती
होतो प्रवासी वेगळ्या दिशांचे
एवढीच मात्र चिरव्यथा होती..
- कुमार..

कोणता संवाद झाला
तुझ्या माझ्या वेदनेचा?
वेदनेची भुक शमली
आकांत उरला वेदनेचा ..
- कुमार..

मी क्षणाक्षणात झुरतो
ती क्षणाक्षणात जळते
ही वेदना अंतरीची
अंतरीच तळमळते..
- कुमार