♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


एका ट्रीपची गोष्ठ

समुद्राच्या पोटात जीव मुठीत 

मुंबई, कोकणबद्दल खूप ऐकले होते. पण, कधी जाण्याचा योग आला नाही. माझ्या मिस्टरांनी नोकरी बदलली आणि त्यांनी अलिबागला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय ऐकून मी तर घाबरूनच गेले. घरी केवळ सहा महिन्याची मुलगी आणि मी दोघीच. अशाही परिस्थितीत त्यांनी चंद्रपूर सोडून अलिबागला जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. आता, मी एकटी कशी राहणार माझ्यासमोर पेच होता. पण, भविष्याचा विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असेल, असे ठरवून त्यांना होकार दिला. अनेक दिवस ते तिथे राहिल्यानंतर त्यांनी आम्हाला कोकणात बोलावून घेतले. एखाद्या शहराविषयी कमालीची ओढ मनात असते. अलिबागला जाण्यासाठी आधी मुंबईला जावे लागते.  चित्रपट, बातम्यांत बघितलेली मुंबई बघायला मिळणार, याचा आनंद होता. मुंबईला पोहोचलो. केवढी ही धावपळ. कोणालाच कोणासोबत बोलण्याची फुरसत नव्हती. मिस्टर तिथे राहून असल्याने त्यांना नवीन काही वाटत नव्हतं. पण, मुंबईची ती गर्दी, लोकल, उकाडा आणि ती धावणारी माणसे यांची एक अनामिक भीती मनात खोलवर रुजली होती. प्रचंड गर्दी आणि गती बघूनच मी घामाघूमच झाली. अलिबागला जाण्यासाठी आम्ही गेट वे ऑफ इंडियाला पोहोचलो. पुढे बोटीने प्रवास करायचा होता. समुद्रातून प्रवास करायचाय, असे सांगताच मी घाबरली. पण, जायचेच असल्याने पर्याय नव्हता. तासभराचा प्रवास होता. मात्र, माझा जीव मुठीतच होता. अफाट सागरी लांटातून वाऱ्याच्या गतीने धावणाऱ्या नाव जणू रस्त्यावरूनच धावत असल्यासारख्या होत्या. तासाभरातच मांडवा बिचला पोहोचलो. माझे हे कोकणातील पहिले पाऊल. वाऱ्याची झुळूक आणि सागरी लाटा बघून मन भरून आलं होतं. मी दूरवर नजर टाकली. तेव्हा आकाश आणि सागर दोघेही एकरुप झालेले दिसत होते. नारळ, केळीच्या बागाही दिसत होत्या. मग, पुढला प्रवास बसने सुरू झाला. तासाभराने अलिबागला पोहोचलो. तिथे महिनाभर राहायचे होते. हळूहळू ओळखी झाल्या. नव्या मैत्रिणी भेटल्या. तासन्‌ तास गप्पा मारू लागलो. एक दिवस मिस्टरांनी सुटी घेऊन मुरुड- जंजिराला जाण्याचा बेत आखला. ऐतिहासिक ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय समुद्र किणाऱ्यावर फिरायला जायचे होते. सकाळीच निघालो. मुरुड किणाऱ्यावरून काही दूर नावेनं प्रवास करून जंजिरा किल्ल्यावर जायचे होते. प्रवास सुरू झाला. मध्यंतरी गेल्यानंतर वाऱ्याची गती वाढली. नाव हलू लागली होती. समुद्राच्या लाटा जोर-जोरात येत होत्या. आता काय होणार, कसं होणार, इकडे नव्हतं यायला पाहिजे, असे अनेक मनात गोंधळ करीत होते. जीव गेल्याचीच भिती वाटू लागायला  लागली. कडेवर नऊ महिन्याची मुलगी अश्रू गाळत होती. शिवाय मे महिन्याची दुपार असल्याने चांगलाच घाम फुटला. रडू येतं होते. "अशा धोकादायक ठिकाणी कशाला आणलांत' असा प्रश्‍न मी मीस्टरांना वारंवार करीत होती. "थांब, धीर धर सर्व काही ठिक होईल' असे म्हणत ते आधार देत होते. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दुर्घटनेची भिती दिसत होती. सहप्रवाशी आणि त्यांची लेकरेही रडू लागली.
होती.  वाऱ्याचा वेग कमी झाला आणि नावं सुखरुप किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली. जलदुर्गाचे भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर 572 तोफा बघितल्या. संपूर्ण किल्ला आणि त्यांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर झिंगा, कोसंबी, सुरमई आदी समुद्री मासांचे भोजन घेतले.
- शिल्पा देवनाथ गंडाटे
नागपूर