♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


दशमान पद्धत

वाचक: दशमान पद्धत कशी शिकवावी, ह्याबद्दल तुम्ही सांगणार ना आज?

लेखक: तो खूप, म्हणजे फारच विस्तृत विषय आहे. गप्पांतून तो नेमका आणि थोडक्यात व्यक्त करणं कठिण आहे. त्याकरता पुष्कळ साहित्य बनवायला हवं. तसं मी स्वतः बनवलंही आहे. तुम्हाला बोललोही होतो. म्हणून दुसरं काही बोलू.

वाचक: दुसरं म्हणजे काय बोलायचं?

लेखक: शिक्षकांची शिकवण्याची गती, रीत आणि बालकांची एकाग्रता या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत, असं मी जे म्हटलं होतं....

वाचक: म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला?

लेखक: खरं सांगायचं तर, शिक्षकांची शिकवण्याची गती, रीत आणि बालकांची एकाग्रता या तीनच बाबींचा विचार करू, असं मी म्हटलं असलं, तरी हे सारं मुळातून बदलायला हवं. त्याकरता गणिताची शिक्षणपद्धति, वर्गांच्या रचना, गुणांनुसार तुकड्या, इयत्तावार विभागणी, इत्यादि रूढ प्रकारांतही मुळातूनच सुधारणा करायला हवी.... असं मला वाटतं हं.

वाचक: थोडक्यात सांगता?

लेखक: थोडक्यात नाही हो सांगता यायचं सगळं. फारतर, दिशादर्शन करू शकेन. किमान अध्यापन आणि कमाल अधिक अध्ययन, हे, मला सांगायची आहे त्या पद्धतीचं एक महत्त्वाचं तत्त्व होय. मुळीच शिकवू नका हे त्या तत्त्वाचं शिखर म्हणा. त्यावर मी एक पुस्तकच लिहिलं आहे, “बालकांना गणित कुणीही शिकवू नका (त्यांचं त्यांना शिकू द्या.) असं त्या पुस्तकाचं नाव आहे.”

वाचक: असं? मोठं गमतीदार नाव दिसतंय. कुठं मिळेल?

लेखक: नंतर सांगतो. बरं, तुम्हाला मी विचारतो, बालकांची एकाग्रता का होत नसावी?

वाचक: मुलं काय, मुळातच चंचल असतात.

लेखक: वाः! अगदी सोप्पं उत्तर! म्हणजे मग तुम्हीसुद्धा पुन्हा बालकांनाच अपराधी ठरवून झोडपता असं म्हटलं तर? अपयशाचं खापर दुसऱ्या कुणावर तरी फोडणं नेहमीच सोपं असतं. त्यात पुन्हा बालकांना काहीच माहीत नसतं. त्यांना या सर्वांचा अर्थही कळत नसतो. त्यामुळं तुमच्या विधानाचा प्रतिवाद करायला ती पुढं येण्याचा संभव शून्य आणि तुम्ही नामानिराळे! तुम्ही म्हणजे वैयक्तिक म्हणत नाही हं मी. म्हणजे आपण सगळीच प्रौढ मंडळी.

वाचक: तुम्ही रागावलेले दिसता. बरं तर मग तुमचं काय म्हणणं आहे? कोण अपराधी?

लेखक: नाही हो, रागवायचं कशाला? पण, मुलं चंचल असतात, असं कुणी ठरवलं? ती मुळीच चंचल नसतात. मला सांगा, त्यांचं पाठांतर चटकन होतं ना? तुमच्याआमच्यापेक्षाही लवकर?

वाचक: त्यांचं पाठांतर चटकन होतं, हे बाकी खरं आहे हं. पण मग शिकवण्याकडे त्यांचं लक्ष का नसतं?
लेखक: तेही सांगतो मग. पण, आधी एक विचारतो, गोष्टी ऐकताना त्यांची एकाग्रता होते की नाही?

वाचक: हे बाकी खरं आहे. पण, गोष्टीत काय, कुणाचंही मन रमतंच.

लेखक: तेव्हा कशी होते एकाग्रता?

वाचक: अहो, गोष्टी काय सगळ्यांनाच आवडतात.

लेखक: आत्ता दोन्ही गोष्टी, अगदी बरोबर बोललात. मूले कुठारः। शिकवण्याकडे लक्ष नसतं याचं कारण, त्यांचं मन रमत नाही. म्हणून त्यांना ते आवडत नाही. किंवा त्यांना शिकवणं आवडत नाही, म्हणून मन रमत नाही म्हणा. त्यामुळं.....

वाचक: शिकवणं आवडत नाही त्यामुळं मन रमत नाही?

लेखक: होय. खरं सांगू? बालकांना तर सगळंच शिकायची इच्छा असते. कारण त्यांना सगळं जग नवीन असतं. त्यामुळं सगळ्याचं अफाट कुतूहल असतं त्यांना. म्हणून तर मुलं येताजाता, इकडे  हात लाव, तिकडे हात लाव, हे वाजवून बघ नाही तर आपटून बघ, नाहीतर हे कशाला, ते काय आहे, असे एकसारखे प्रश्न विचारीत आणि सतत उचकपाचक करीत असतात. रांगती बाळंसुद्धा, सापडलेली वस्तु तोंडात घालून चव पाहा, चावून पाहा, आपटून पाहा, कशात तरी हात घाल, असं सतत करीत असतात ना? पाळण्यातली बालकंसुद्धा हातातली वस्तु खाली टाक, नाहीतर काही तरी तोंडात घाल, असं करीत असतात. कारण, त्यातूनही ती काही ना काही शिकत राहतात. अहो, हा निसर्गक्रमच आहे. परक्या घरी गेल्यावर नवीन काही तरी दिसतं. ते पाहिल्यावर ती काही प्रश्न विचारतात की नाही? पण, आपण त्यांना दटावतो, “कशालाही हात लावायचा नाही बरं का. नाही तर, मार खाशील घरी गेल्यावर.” काय?

वाचक: अगदी खरं. पण, अहो, दुसऱ्याची वस्तु. फुटलीतुटली तर काय करायचं?

लेखक: तो निराळा प्रश्न. पण, त्यांचं तर असं अगदी निरंतर चालू असतं, हे खरं ना? कारण, त्यांना शिकायचं असतंच. आणि खरं तर असल्या प्रत्येक उचापतीमधून (म्हणजे आपण म्हणतो हं) मिळणाऱ्या प्रत्येक अनुभवातून ती काही ना काही शिकतातच. तोंडात घातलेल्या प्रत्येक वस्तूची चव निराळी असते, काही कडक तर काही मऊ असतात, हे रांगती बाळं शिकतात. वस्तु खाली टाकली की पाळण्यातल्या बालकाला गुरुत्वाकर्षणाचा अनुभव येतो, असं डॉ. एल्किंडांनी म्हटल्याचं तुम्ही वाचलंतच की. मिळालेले अनुभव मुलं शब्दांत मांडू शकत नाहीत. मात्र, त्यांना तो जाणवतो. पण, त्यावरूनच आपण त्यांना दटावीत राहतो. अशी माझी मीमांसा आहे हं. मी शिक्षणतज्ज्ञ नव्हे, किंवा मानसशास्त्रीही नव्हे. पण, त्यांचं कुतूहल आपण शमवू शकत नाही. म्हणून शिक्षकांच्या शिकवण्यालाच कंटाळून ती बिचारी सतत विषय बदलू पाहतात. सर्वच बालकांना काही तरी शिकायची ऊर्मी असतेच. अगदी सतत. आपणच कमी पडतो, असं मला वाटतं. खरे अपराधी, आपणच, आई, वडील, घरातली मोठी माणसं, शिक्षक, शिक्षिका, शिक्षणाधिकारी, संचालक, शिक्षणमंत्रीसुद्धा शिक्षणाशी संबंधित सगळेच, आपण सगळेच अपराधी आहोत. पण, तुम्ही तर बालकांनाच अपराधी ठरवून मोकळे झालात. कित्ती सोप्पं विश्लेषण! काय?

वाचक: खरं आहे बाकी तुमचं. पण, तुम्ही म्हणता, आपलं शिकवणं त्यांना आवडत नाही, हे कसं काय?

लेखक: कारण, तुम्ही शिकवता तसं त्यांना शिकायचं नसतं. स्वतः करून पाह्यची ऊर्मी असते. लहान मुली नाही का आईला मदत करण्याच्या नावाखाली, स्वयंपाकघरात लुडबुडतात? पण तसं त्यांना कुणी करू देतं? नाही. आणि इतका वेळ एका ठिकाणी स्वस्थ राहणं त्यांना अजून जमायचं असतं. कारण, त्यांची शारीरिक ऊर्जासुद्धा अफाट असते. तान्ही बाळं सतत पाय हलवत असतात, तुम्ही पाहिलंच असेल. दिवसात ती जसे आणि जितका वेळ पाय हलवतात, तसे आणि तितका वेळ तुम्हीआम्ही हलवू शकतो काय? करा विचार आणि सांगा. किंवा करून पाहा.

वाचक: (हसतात) शक्यच नाही.

लेखक: आता का? गंमत म्हणून विचारतो. भिंतीवर रेघोट्या मारायला मुलांना आवडतं, तसं आपण त्यांना करू देतो? कुणी तरी देईल काय?

वाचक: अहो पण भिंती खराब होतात ना.

लेखक: खराब? तुम्ही आम्ही त्याला खराब म्हणतो. त्यांचं म्हणणं आम्ही चित्रं कढतो. तेव्हा तुम्ही खराब म्हणता, ते त्यांना कसं कळेल? आमच्या घरी एका भिंतीलाच आम्ही फळ्याचा काळा रंग दिलाय. चार फूट रुंद. उंची सहा फुटांच्याही वर आणि खाली जमिनीपासून दीडेक फूट सोडून. आणि कुणीही लहान मुलं आली की आम्ही त्यांना खडू-फडकं देतो. ती रेघोट्या मारीत बसतात. आईला त्रास देत नाहीत. आणि मी चित्रं काढली म्हणतात. शाळेतही मी असंच केलं होतं. पहिलीच्या वर्गांत फळ्याखालीही भिंती काळ्या रंगात रंगवून घेतल्या होत्या. आणि पहिलीच्या शिक्षिकांना सांगितलं, पहिले काही दिवस मुलांना काहीही काढू द्यात. रेघोट्या मारू द्यात. अभ्यास बाजूला ठेवा.

वाचक: मुलं अगदी रंगून जात असतील.

लेखक: तुम्हालाही असंच वाटतं ना? पण, मघाशी शिक्षणाशी संबंधित ज्या लोकांची मी यादी केली, त्या सर्वांनाच केव्हा वाटेल, त्याची मी अगदी उत्कंठेनं वाट पाहतोय. दुसरी बाब, बालकांनी प्रश्न विचारलेलेसुद्धा कित्येक शिक्षकांना आणि आईबाबांनाही आवडत नाहीत. माझ्या नातीच्या बाई तिला दटावायच्या, अमृता, तू फार प्रश्न विचारतेस. आता गप्प राहा, असं. म्हणजे तिच्या बाईंनी तिची चौकसबुद्धीच खुडून टाकली नाही का? खरं तर, हे कळलं तेव्हा माझं ह्या बाबीकडे २५/२६ वर्षांपूर्वी प्रथम लक्ष गेलं. त्यांच्या शंकांचं निरसन कुठं कधी होतं का? शंका आली याचा अर्थ त्यांना उत्कंठा निर्माण झाली आहे. आणि त्यांना ते शिकायचंय, पण कळलं नाही, असा होतो ना? मग, आपण त्यांचं निरसन केलं नाही, करू शकलो नाही, म्हणजे आपण त्यांना शिकू दिलं नाही, असाच तर्कशुद्ध निष्कर्ष निघतो ना? आता सांगा, अशा वेळी त्यांनी काय करावं? पण, सगळ्यांच्याच साचेबंद शिकवण्यामुळं त्यांना ते कंटाळवाणं, रटाळ, नीरस, पचपचीत, सुचतील ती विशेषणं लावा, होतं, असं मला वाटतं. आणि असं व्हायला लागलं की मग, त्यातला त्यांचा आनंद हरपतो. मग आनंद वाटेल, असे इतर काही विषय ती शोधू लागतात. म्हणून आपण त्यांना चंचल म्हणायचं. वाः! आनंदच नसेल तर एकाग्रता कशी साधेल? मला सांगा, गोष्टी ऐकताना त्यांची एकाग्रता असते. तेव्हा अचानक कुठून येते हो एकाग्रता? पण, बालकं चंचल असतात, असं ठरवलंच आहे तुम्हीआम्ही. मोठी माणसं नसतात का चंचल? काय हो, आपलं मन एकाग्र असतं का कधी तरी? बहिणाबाई म्हणतातच की, मन वढाय वढाय. आता होतं भुइवरी, आता गेयं आभायात. ते तर सतत भटकतच असतं, आपण किती वेळ एखाद्या विषयावर मन एकाग्र करू शकतो? गीतेतलाच एक प्रसंग सांगतो. “तू सांगतोस तो योग मला जमणार नाही. कारण मन फार चंचल आहे. त्याचा निग्रह वाऱ्यापेक्षाही कठिण आहे, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्।” असं म्हणत जेव्हा अर्जुन कुरकुरायला लागतो, तेव्हा, “असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम्।” असं श्रीकृष्ण मान्यच करतो. एकनाथमहाराजांचीही एक छान ओवी आहे बरं का.

वाचक: असं? सांगा की.

लेखक: ऐका, मेरूची बांधवेल पुडी। आकाश करवेल घडी। वायूची मुरडवेल नरडी। परि मनाचिया ओढी, अनिवार।।

वाचक: वाः वाः! म्हणजे एक वेळ, मेरूची पुडी, आकाशाची घडी करता येईल आणि वायूची मुंडीच मुरगाळता येईल. पण मन आवरता यायचं नाही. वाः! अति सुंदर! काय छान ओवी आहे हो? हे खरे मानसशास्त्री. पण, मग मुलांची एकाग्रता कशी होते?

लेखक: सांगतो. तुम्ही पाहिलं असेल, मुलांना झोप चटकन लागते. होय ना? संध्याकाळी तर अगदी जेवतानाही डोळे मिटू लागतात मुलांचे. तशी तुम्हाआम्हाला लागते का हो?

वाचक: नाही लागत खरी. पण, असं कसं होतं?

लेखक: कारण, आपल्याइतके नानाविध विषय त्यांच्या डोक्यात नसतातच. नाना प्रकारच्या चिंतांमुळं काहींना तर कित्येकदा रात्रभर झोप लागत नाही. पण, मुलांना इतकी व्यवधानंच नसतात. त्यांना असतं ते केवळ कुतूहल. सगळ्या जगाचंच कुतूहल. त्यामुळंच बालकांची एकाग्रताही चटकन होते. पण, आपली नाही होत. तरी उलट पक्षी, आपल्यापैकीसुद्धा कुणाचंही असो, ज्यात आपल्याला आनंद वाटतो, समजा कादंबरीवाचन. तर त्यात एकाग्रता आपोआप होते ना? भरतकाम, गायन, वादन, चित्र रंगवणे असल्या आपापल्या आवडीच्या सगळ्या विषयांत, इतकं मन रमतं की, तासन् तास अगदी जगाचंही भान राहात नाही आपल्याला. खरं ना?

वाचक: म्हणजे मग बालकांचा सहभाग वाढवायला हवा, असं तुम्हाला सुचवायचंय का?

लेखक: अगदी. निर्विवाद. म्हटलंच की मी. पण कृतियुक्त हवा. नाही तर बालकांचा सहभाग म्हणजे केवळ बोलणं, किंवा प्रश्नोत्तरं. तसं नव्हे. मुख्यतः त्यांना ज्यात आनंद वाटेल अशा शिक्षणपद्धतींचा अवलंब नको करायला? चित्रं काढायला द्यावीत, रंगवायला सांगावं, काही तरी ठाकठोक करायला सांगावं, दगड गोळा करायला सांगावेत. गणितातली दशमान पद्धत कशी शिकवायची हे समजून घ्यायचंय ना? मग दहा काड्या घेऊन रबर बँड लावायला सांगा, पिशव्यांतून दहा दहा बिया भरायला सांगा मुलं रंगतील की नाही? पण, शाळा म्हणजे हाताची घडी आणि तोंडावर बोट! म्हणूनच सर्वांची, मुळापासूनच पुनराखणी करायला हवी. अगदी वर्गातली बाकंसुद्धा काढून टाकायला हवीत. जखडल्यासारखं होत असेल मुलांना. आणि आज कसं आहे? बाईंनी फळ्यावर लिहीत राहायचं आणि मुलांनी ते वह्यांत उतरवीत राह्यचं. मला त्या कल्पनेनंच कसंसंच व्हायला लागलंय, आत्तासुद्धा.

वाचक: मग काय  करायचं? आणखी काही उदाहरणं सांगता?

लेखक: सांगतो की. अपूर्णांक शिकवायचेत ना? मग एक आयत काढा. त्याचे, समजा आठ, बारा सारखे भाग करा आणि त्यातले पाच रंगवा, असे खेळ नाही का देता यायचे? अशा खेळांतूनच अपूर्णांकांचा खरा अर्थ कळेल ना?

वाचक: पण, इतक्या सगळ्यांना कागद द्यायचे म्हणजे किती कागद लागतील?

लेखक: त्याकरता मी अक्षरपाटीची कल्पना शोधलीय. नंतर सांगेन. पण असे गणिताचेसुद्धा खेळ खेळायला सांगता येतात. आणि बाईंनी मुलांचं केवळ निरीक्षण करीत राहायचं. माँटेसरीबाईंचंही तेच म्हणणं आहे ना? खरी चूक आपल्या गणित शिकवण्याच्या पद्धतींतली अशी आहे की आम्ही संख्या शिकवतानाही वस्तूंचा उपयोग करण्याचा कंटाळाच करीत असतो. पाढ्यांतले दुणे, त्रीक, चोक म्हणजे काय? व्यवहारात हे शब्द येतात का कधी? मग, दोनदा, तीनदा,...असं का नाही म्हणायचं? अहो, संख्यांची नावं काय, किंवा संख्याचिन्हं काय, निरर्थक आहेत. आपण त्यांना अर्थ दिलाय. बालकांना कुठं माहीत आहे अजून तो? खरं तर नाना प्रकारच्या खेळांतून गणिताचे संबोध बालकांना आपले आपणच उलगडत यायला हवेत. त्याकरता मी दीडशेच्या वर खेळ बसवले आहेत.

वाचक: दीडशे खेळ? दाखवा तरी आम्हाला.

लेखक: मी त्यावर एक पुस्तकच लिहिलंय. अजून प्रसिद्ध नाही केलं. एकदोन वर्षं प्रत्यक्ष अनुभव घेऊन काही बदल, लागले तर करून मग प्रसिद्ध करू. तर, संख्यांना मुळात कसलाच अर्थ नसतो. म्हणून गणितातल्या कोणत्याही घटकाकरता वस्तूंचा वापर हवाच. तोच आपण शिकवताना टाळतो. तुम्हाला एक चिनी म्हण सांगतो. अध्यापनाचं सारच समजा ती म्हण म्हणजे शिकण्याशिकवण्याचं अंतिम साध्य समजा. काय साध्य? एखादी नवी संकल्पना समजणं, तिचा साक्षात्कार होणं. बरोबर ना?

वाचक: खरंय. पण, ती म्हण सांगाना, सर.

लेखक: म्हण अशी, “ऐकलेलं विसरतं. वाचलेलं आठवतं. पण, केलेलं समजतं.” आपण कुठं मुलांना काही करायला देतो? देतो?

वाचक: नाही देत करायला, खरंय हं, अगदी खरंय.

लेखक: मघाशी लहान मुलींचं उदाहरण सांगितलं. तिला आई स्वयंपाकघरात येऊ देते का? पाढेसुद्धा आंधळेपणानं पाठ करायला सांगतो. तेसुद्धा बनवायला सांगावेत. त्याचेसुद्धा खेळ बनवलेत मी.

वाचक: पाढे बनवायचे खेळ? म्हणजे काय?

लेखक: सांगेन पुन्हा केव्हा तरी. आणखी मी काही चलिकासुद्धा केल्या (movies) आहेत.

वाचक: पाढ्यांच्या चलिका? म्हणजे काय?

लेखक: चलिका उघडली की एक मणिचौकट दिसते. दहा तारा आणि प्रत्येक तारेत दहा मणी, असे एकूण शंभर मणी.  त्यांच्यावर १ पासून १०० पर्यंतच्या संख्याही लिहिल्या आहेत.

वाचक: पण मला सांगा, उदाहरणार्थ, तीनचा पाढा कसा बनवायचा?

लेखक: तीनचा पाढा बनवायचा आहे तर, तीनची चलिका उघडाची. तिथं एक बटन आहे. त्यावर माउसनं क्लिक केलं की टक, टक, टक असा आवाज करीत नेमके तीन मणी सरकतात. पुन्हा केलं की पुढचे तीन. त्यावरून एकूण सहा मणी सरकल्याचं दिसतंच. कारण, मण्यांवर अनुक्रमांक लिहिले आहेत. म्हणजे एकदा क्लिक केलं की तीन दोनदा केलं की सहा,... ते लिहून ठेवायचं. झाला ना तीनचा पाढा? खरं तर वर्णन किती करणार? प्रत्यक्षच पाह्यला हवं. पण मुलांना आवडेल की नाही?

वाचक: नक्कीच. तुमच्या ह्या चलिका पाह्यलाच हव्यात. पण...

लेखक: पण, त्यापेक्षाही पाढे रचण्याचा एक खेळच मी बनवला आहे. त्याबद्दल पाढे बनवायच्या वेळी बोलू. असो तर मुख्य विषय, संबोध समजणं. आणि केल्याविना समजत नाही. पण, करायला तर आपण देतच नाही. आपण तर मग समजण्याचा प्रश्न येतोच कुठं? आणि तरीही त्यांना समजलं नाही, असं म्हणून शिक्षा करायला पुढं असतो ते आपणच. असल्या शिक्षेवरूनच तर आपली चर्चा सुरू झाली ना? आपण अनेकदा, केवळ आकड्यांनाच प्राधान्य देतो, याचं उदाहरण द्यायचं तर, तुम्हीच आपल्या मुलीचं उदाहरण दिलंत ना? चौदाचा पाढा शिकवताना आपण दहाचा आणि चाराचा पाढा मांडून बेरीज करायला सांगितली. बरोबर ना? १०चा आणि ४चा पाढा एकत्र केले की १४ पाढा होतो, हे तुम्हाला इतक्या वर्षांनंतर कळतंय. लहान मुलांना मुळात कशाचाच अर्थ माहीत नसतो.

वाचक: बरं मग? नाही तर काय करायचं?

लेखक: म्हणजे आकडेमोडीनंच शिकवलंत ना? अहो, आकडे अर्थशून्य असतात, म्हटलं ना मी? इतक्या वर्षांच्या सरावानं आपल्याला त्यांचा अर्थ कळतो. पण तसा मुलांना कसा कळेल? आम्हीसुद्धा घोकलं, एकवीस आठा अडुसटद्दासे आणि चोवीस साताही अडुसटद्दासे, असं दोन्ही ठिकाणी अडुसटद्दासेच कसं, ते मला कळत नसे. दोन्ही सारखेच कसे, ते तर कधी कळलंच नव्हतं. त्यामुळंच तर गणित माझा अगदी नावडता आणि त्याचाच परिणाम म्हणून १२ व्या वर्षांपर्यंत गणित माझा अत्यंत कच्चा विषय झाला असावा.

वाचक: मग काय करायचं? हेच उदाहरण घेऊन सांगता मला? म्हणजे चौदाचा पाढा कसा सांगायचा?

लेखक: हे पाढे म्हणजे पुष्कळ पुढची पायरी आहे, मध्ये कित्येक पायऱ्या आहेत. त्या कुणी बांधायच्या? तर, आधी दोनपासून नवापर्यंत पाढ्याचं बोलू, पुढच्या वेळी, खरं तर. तरी पण, मुलांना अकरा, बारा इत्यादींचे अर्थ कळले आहेत, असं समजून थोडंसं सांगतो. आणि मधल्या सगळ्या पायऱ्या सांगायला पुष्कळ वेळ लागेल. दशकसुट्टे, किंवा दशक-एकक असले शब्दही इतक्यात उच्चारायचं कारण नाही.

वाचक: कसा बनवायचा?

लेखक: दहादहा मण्यांच्या माळा किंवा १० बिया भरलेल्या पिशव्या बनवायला मुलांनाच सांगावं. दाबून बंद करता येतील अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या आणा. पण, शक्य तोवर दहा बियांची पिशवीच घ्यायची. भरतानासुद्धा मध्ये एक कागद आणि त्याच्या दोन्ही बाजूंना पाच पाच बिया घाला. सुबाभुळच्या बिया अक्षरशः पोत्यानं मिळतात. आता, १४ चा पाढा कसा बनवायचा ते पाहू. दहाची एक पिशवी आणि ४ सुट्टे मणी/बिया घ्या. म्हणजे चौदा एकदा घेतले. पुन्हा एकदा चौदा मणी/बिया असेच घ्या. दोनदा झाले. एकूण किती झाले? ते लिहून ठेवायला सांगा. असं करीत जा.

वाचक: कल्पना छान आहे हं. नक्की करून पाहीन. आणखी काही?

लेखक: तुम्ही करून नका पाहू. मुलीला करायला द्या. आणि मला कळवा. तरी, हेही तितकं सोपं नाही बरं का. कारण, मधल्या पायऱ्या आपण घतल्याच नाहत. बरं, आणि अडचणी आल्या तर विचारा.

वाचक: अडचणी आल्या तर विचारीनच. आणखी काही?

लेखक:  दुसरं एक फार महत्त्वाचं तत्त्व माझ्या ह्या पद्धतीचं आहे. तेही सर्वांनी ध्यानात ठेवायला हवं.

वाचक: ते कोणतं?

लेखक: एखादा संबोध कुणा बालकाला केव्हा उलगडेल, कशानं उमगेल, त्याबद्दल कसलाही नियम नाही. म्हणून दुसरं तत्त्व असं, “कळेल तेव्हा कळेल,” हेच तत्त्व पाळावं. घाई मुळीच नसावी. अवसर द्यावा. कोणतेही संबोध बालकांना आपले आपण प्रतीत व्हावेत, म्हणून समजेतोवर धीर धरावा. पण, तेवढा धीर शिक्षकांना नसतो वडिलांनाही नसतो. आणि आईला तर त्याहून नसतो. तिचा हात तर रपाटे मारायला शिवशिवतच असावा. म्हणून त्या दोघांच्यासाठीही एक सूचना, सूत्र म्हणा ना? अपेक्षा, परीक्षा आणि शिक्षा ह्या तीन क्षा टाळून प्रतीक्षा ह्या चौथ्या क्षाचा अवलंब करा. बास? थांबू या?

वाचक: येऊ मग आता? पण पुस्तक कुठं मिळेल ते सांगता ना?

लेखक: श्री. नागेश शं. मोने, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, पुणे. ९२२५३४०९३५ यांच्याशी संपर्क साधा. बरंय, या पुन्हा.

- - प्रा. मनोहर रा. राईलकर
९८२२०६७६१९,
railkar.m@gmail.com