दिपावली म्हणजे रोशनाईचा सण, प्रकाशाचा सण, दिपकांचा सण. पण ही रोशनाई कशाची असावी ? ही रोशनाई ज्ञानाची असावी, प्रेमाची असावी, बंधुभावाची असावी, सहकार्याची असावी, ममतेची, करुणेची, मानवतेची असावी, शुद्ध अध्यात्माची, सदाचाराची, आत्मचिंतनाची, शील, समाधी, आणि ध्यानाची असावी, परोपकाराची, सामाजिक सेवेची असावी.
सांगा पाहू अशी दिपावली आपण किती लोकं साजरी करतो ? खर सांगायच तर अगदी बोटावर मोजण्या ईतकी लोकचं अशी दिवाळी साजरी करतात.
आपण भाग्यशाली आहोत, की आपणांस घर आहे, परिवार आहे, काळजी करणारे आहेत, आपले लाड पुरवणारे आई बाबा, बहीण भाऊ, आणि सगे सोयरे आहेत, कौतुक करणारे आहेत. शिवाय आपण धष्ट पुष्ट आहोत, निरोगी आहोत, बुद्धीने सुद्धा कुशल आहोत, आजीविका कमावण्यात सुद्धा सक्षम आहोत. पण सगळेच जगात आपल्या सारखे भाग्यवान आणि नशीबवान नाहीत. काही बिचारे सर्व काही असून सुद्धा अनाथ आश्रम मध्ये दुःखी जीवन जगत आहेत. पारीवारीक लोकांनीच त्यांचा त्याग केलेला आहे. काही बिचारे जन्मजात फूटपाथ वर जीवनयापन करीत आहे. काही जर्जर आजाराने ग्रसित आहेत, तर काही जन्मजात शारीरिक अपंगत्वाने ग्रसित आहेत. काही लोकांना घर दार नाहीच पण दोन वेळेस साधं पोटभर जेवण सुद्धा मिळत नाही.
मग मला सांगा आपण जशी दिवाळी साजरी करतो तशी त्यांना पण करावी वाटत नसेल काय ? आपल्या मुलांना आवडीचे कपडे, भोजन, फटाके, फराळ, दाग दागिने सर्व काही मना प्रमाणे हव असतं, तसच त्यांना पण हवहवसं वाटत नसेल काय ? वाटतं हो वाटतं. पण दुर्दैव त्यांना समजून घेणारे, मदतीचा हात देणारे आहेत, पण ते हात फार कमी पडतात. त्यांचे दुःख आणि अश्रू पुसणारे हात नक्कीच आहेत पण त्यांची मदत अपुरी पडते. शाषनाची मदत तर सोडाच, शाषनालाच जेवढ असेल तेवढ कमी पडत असते.
अश्या वेळेसच या गरजवंताना मदतीचा, मायेचा, करुणेचा, हात देऊन त्यांना पण खरी दिवाळी साजरी करता आली पाहिजे ही मानवीय जबाबदारी आमचेवर येऊन पडते. पण आम्ही सुद्धा स्वत:च्या वैभवात, आनंदात, नवीन वस्त्रात, दागिण्यात, पक्वांन्नात, चमक, धमक, गाडी, बंगला, दिखाव्यात, एवढे मग्न असतो की कधी आम्ही माणुसकी या नात्याने या दुखीतांचा अंतर्मनातून विचार सुद्धा करीत नाही. दिवाळीचे दोन तीन दिवस उलटून गेल्यानंतर मग आम्हांस जाणवते की कामवाली बाईला काही द्यायला पाहीजे, सफाई कर्मचारी आला त्याला काही द्यायला पाहिजे, तोपर्यंत दिवाळीचा उत्साह आणि रोशनाई सुद्धा मंद पडलेली असते. फराळ पण शिळा झालेला असतो. मग हे शीळ पाथ ते पण अल्पशा प्रमाणात या अनाथांच्या हातावर भीक म्हणून टाकून आम्ही आपल्या कर्तव्य पूर्णतेची ढेकर देऊन मोकळे होत असतो. सर्वच जर देवाची लेकरं आहेत तर असं का व्हावं ? समाजात एवढी मोठी विषमतेची खाई का असावी ? आणि अशी समाजाची दयनीय अवस्था असतांना आम्ही जेवढ्या सन्मानाने देवाला नैवेद्य लावतो, तोच सन्मान नैवेद्य जर या देवाच्या अनाथ, बेघर लेकरांना दिला तर परीस्थिती नक्कीच बदलेल. आणि तीच खरी दिवाळी ठरेल. त्यासाठी सम्रृद्ध समाजाची संकुचित, कुंठित, दबंग, पुंजीवादी, बनावटी, मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे...
या दिवाळीला आपण संकल्प करूया, किमान एका अनाथ गरीब मुलाला किंवा वृद्धाश्रमात असणाऱ्या वयोवृद्ध माता पित्याला स्वतःच्या पारिवारिक सदस्या प्रमाणे सन्मान देऊन त्याची खरी दिवाळी साजरी करूया. आपण बऱ्याच दिवाळ्या साजऱ्या केल्या आणि स्वानंद घेतला. या दिवाळीला अनाथांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर खरे हास्य फुलवूया. त्यांच्या सोबत रोशनाई लावूया, नवीन वस्त्र, फटाके, फराळ पक्वांन्न मिळून यांचा आस्वाद घेऊया. पहिला नैवेद्य त्यांना लावूया. मग बघा किती आत्मीक सुख मिळते ते. दिवाळी नंतर आपण आप्त मित्रांना, नातेवाईकांना भरपूर नवनवीन वस्तू, फराळ, कपडे आणि इत्यादि भेट म्हणून देतो. त्यात काही वाईट पण नाही. त्याने आपसी प्रेमच वाढतं. पण तेच खऱ्या अर्थाने ज्यांना त्याची गरज आहे त्यांना दिलं तर यासारख दुसर आत्मीक सुख आणि पुण्य कर्म नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्या दिवशी देशात कुणी उपाशी नसेल, कुणी शिक्षणा पासून वंचित नसेल, बेघर नसेल, कुणी उघडा, नागडा नसेल, त्या दिवशी खरी दिपावली साजरी होईल. ज्या दिवशी अंध श्रद्धा संपेल, बाबागीरी संपेल, आणि माणुसकीची पूजा होईल, माणुसकीतच ईश्वर शोधल्या जाईल, ती खरी दिपावली असेल. ज्या दिवशी भ्रृण हत्या, अपराध, भ्रष्टाचार, अविद्या, जात, पात, दंगे, चोरी, लाच, लूचपत थांबेल, सर्वांना यथायोग्य अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षा, सुरक्षा, रोजगार, मिळेल, हुंडा बळी थांबेल, त्याच दिवशी देशात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल, राम राज्य स्थापित होईल.
जीवनाच्या आपाधापीत मनुष्य माणुसकी विसरत चालला आहे, भावना विहीन होत चाललाय, स्वार्थाच्या पलीकडे त्याला काही दिसेनास झालय. घरोघरी जेव्हा खऱ्या अर्थाने "माणुसकीचा दीपक उजळेल", सामाजिक बांधिलकी आणि जाबाबदारीची जेव्हा सर्वांना अंतर्मनातून खरी जाणीव व्हायला लागेल. त्या दिवशी देशात आणि घरोघरी खऱ्या अर्थाने खरी दिवाळी साजरी होईल.
विश्व विपश्यना आचार्य आणि कल्याण मित्र स्वर्गीय श्री सत्यनारायणजी गोएँका यांचे खालील दोन दोहे अतिशय अर्थपूर्ण आणि बोध घेण्यासारखे आहेत.
तुझको प्यारी जिन्दगी,
तुझको प्यारे प्राण...
औरों की भी जिन्दगी,
अपनी सी ही जान...
धरम जगे फिर मनुज मे,
मनुज बने भगवान...
सेवा, करुणा प्यार से,
धन्य होय इंसान...
सबका मंगल होय !!!
सबको दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ !!!
सुनील पाटोळे,
169, मानेवाड़ा बेसा रोड,
अलंकार नगर,
नागपुर - 440044
दूरध्वनी क्र.
097760 38850
070777 56627
patolesunil009@gmail.com