-किरण शिवहर डोंगरदिवे
समता नगर, मेहकर
मोबा, ७५८८५६५५७६ ता.
मेहकर जि बुलडाणा
पिन 443301
-----------------------------
बोट धरून चालताना
स्वप्नवत जपली
कोवळी पावलं
पंखात बळ पेरताना
दिली वास्तवातल्या
निखार्यांची चाहुल
त्यांचे वेगळेच अक्षरबंध
अन निराळीच मोडीलिपी
जगाच्या व्यवहारापल्याड
अत्तराने भरलेली असते कुपी
त्यांची खडकाची माया
जपतो जीव सारा ओतून
बाप नारळ कवळं
ओल सारी आतून आतून
ना दुधावरची साय
न लोण्याचा तो गोळा
तरीही त्याच्यात दिसतो
तो शिवशंभू भोळा
त्याची कोरडी पापणी
ओलसर तरी माया
जगाच्या ओसाड वाळवंटात
वडाची घनगर्द छाया
असा घनगंभीर अतिव्याकूळ
कातळ म्हणजे बाप
माय मेल्यावर मात्र त्याला
पाझर फुटतो आपोआप
****************************************************
(2) शबरी
शाळेच्या वाटेवर बोरं विकत बसे म्हातारी;
चिलीपिली तिच्याभवती गोंगाट करत भारी .
टोपलीमधल्या बोरांची चव असे न्यारी;
म्हातारीला बघून आठवे रामाची शबरी .
जशी जशी भवताली पोरं होत गोळा;
तसतसा हरखुन जाई तिचा जीव भोळा .
‘चार आण्याला मूठभर’ भाव होता रास्त;
विकत घेण्यापेक्षा पोरं चाखून बघत जास्त!
कुणीतरी सांगे ‘तिचा परदेशात असतो लेक;
दर महिन्याला पाठवतो दहा हजारांचा चेक !’
गुरुजींनी विचारलं एकदा ठरवून काहीतरी;
‘बोरं का विकता? रग्गड पैसा आहे ना घरी ?’
हताश हसून ती म्हणाली ‘काय सांगू लेकरा तुला;
गोजिरवाणा एक नातू बी आहे परदेशात मला...
...पण अजून तरी मी त्याला पाह्यलेलं नाही;
माझ्या हातचं बोर त्यानं चाखलेलं नाही.
...म्हणुन मी शाळेपुढं बोरं विकते अशी;
न पाह्यलेल्या नातवाला शाळेतच शोधते जशी !’
म्हातारीच्या ममतेचा चेक सांगा कधी वठेेल...?
बोर रानातील वाळली! तिला नातू कधी भेटेल ?
अनोखा व्हॅलेंनटाईन
हरबऱ्याचा भाव
अचानक खाली आला म्हणून
हताश बसलेल्या
चिंतातूर घरधन्याकडे पाहत
ती बोलली 'चला दोन घास खाऊन घेऊया,
अजून चार दिवस कळ सोसावीच लागल....
घरात कळती लेक आहे .......
म्हणून ही रास विकेस्तोवर
दम काढावं लागलं.....
अन् हरबऱ्याचा भाव वाढेस्तोवर
तुम्हाला ओसरितच निजाव लागलं".
अशा मायबापाचा फाटाका संसार
ती पाठमोरी झोपून ऐकत होती
अश्रू भिजल्या स्वप्नाच्या पापणीत
अनोखा व्हॅलेंटाईन दिवस
साठवत होती
********************