व्याघ्र संवर्धनाची चळवळ यशस्वी
करण्याकरिता शेतकरी संरक्षणही महत्वाचे
चंद्रपूर व्याघ्र जिल्ह्यात सर्वदूर जंगलाने व्यापलेले क्षेत्र आहे. गोंडपिंपरी तालुक्यातही घनदाट जंगल आहे. कुशीत अनेकांच्या उपजीविकेची शेती आहे. त्यात राबून उत्पन्न घेतले जाते. मात्र, जंगलाच्या शेजारची ही शेती वन्यप्राण्यांमुळे नष्ट होत आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी शेतात येतात. पिकांची नासाडी करतात. हे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासला, वैतागला. वन्यप्राण्यापासून या पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याने शेतीभोवती वीजतारांचे कुंपण केले. त्यात वीज प्रवाह सोडला.
गोंड़पिपरी तालुक्यातील धानापूर गावातील एक शेतकरी १ नोव्हेंबरच्या (2016) रात्री आपल्या शेतात वीजप्रवाह सुरू करून घरी परतला. आतातरी वन्यजीव पिकाची नासधूस करणार नाहीत, या आशेनं तो रात्रभर झोपला. पण, एक चिंता वारंवार सतावत होती. कुण्या मनुष्याला वीजेचा धोका झाला तर? म्हणून वीजप्रवाह सकाळीच बंद करणे गरजेचे होते. (काही महिन्यापूर्वी याच गावातील शेतशिवारात लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाने एक मनुष्य मृत झालेला होता) त्यासाठी तो सकाळीच उठला. त्याने शेत गाठले. धुऱ्यावर गेला. तेथील चित्र बघून त्याला धक्का बसला. हा नुसता धक्का नव्हता, तर त्याच्या हातून झालेला खून होता. कुंपणाच्या जवळच जंगलाचा राजा पडला होता. तो मृतावस्थेत होता. इतक्यात व्यायामासाठी निघालेले तरुण आले. त्यांना हकीगत सांगितली. त्या वाघास रस्त्याच्या कडेला झाकून ठेवले. नंतर, दिवसभरात शेतातच गड्डा खोदला. रात्रीच्या वेळेस सदर युवक व शेतमालकाने दोन नातेवाईकांच्या मदतीने मृत वाघास ओढत नेले. खड्डयात पुरले. पुरावे नष्ट करून गुन्ह्यापासून दूर पळण्यासाठी ते वाट शोधत होते.
तीन नोव्हेंबरच्या दुपारी परिसरात काणकुण सुरू झाली. वाघ मेला, वाघ मेला बायामाणसं बोलू लागले. चर्चा गावभर झाली. पण, खात्रीशीर माहिती नव्हती. चार नोव्हेंबरला गावाचे नाव चर्चेत आले. ज्या संधीसाधूना नेमके शेत आणि शेतमालकाचे नाव कळले त्यांनी वनविभागास त्वरित माहिती देण्याऐवजी 4 नोव्हेंबर च्या सकाळी निनावी फोन द्वारे शेतमालकास पैशाची मागणी केली। नाहीतर वनविभागाला माहिती देऊ अशी धमकी दिली। आधीच घाबरलेला शेतकरी या अनपेक्षित फोनने चांगलाच गांगरला। काय करावे सुचत नव्हते मागणी लाखात असल्याने ती पूर्ण करणे शक्य नव्हते. इकडे शेतमालकाची धाकधूक वाढली होती. उद्या घटना उघड झाली, तर आपले काही खरे नाही, याची कल्पना त्याला आली. नंतर फोन वर उत्तर न दिल्याने शेतमालकाच्या भावाच्या मोबाईल वर फोन करू लागले, पैशाची मागणी सुरु होतीच. या सर्व संकटांचा सामना करायचा ठरवून तो गोंडपिपरी येथील वनविभागाच्या कार्यालयात आला. छातीवर हात ठेवत हिंमत केली. घटनेची कबुली दिली. वीजप्रवाहाने वाघ मेला जी!, असे तो सांगत होता. वनाधिकारी घामघूम झाले. आता चौकशी लागणार, पंचनामा होणार! अगदी तसेच झाले. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुजविलेला खड्डा खोदला. माती बाहेर काढली. बघतात तर काय वाघाचा मृतदेह होता. आरोपी शेतकऱ्यास ताब्यात घेतले. गुन्हा नोंद केला. वाघाचे शव वैद्यकीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही झाली एक घटना.... अश्या प्रकारच्या विद्युत प्रवाहाने वन्यप्राणी मरण्याच्या घटना वनलगताच्या शेतात नव्या नाहीत...
मागील वर्षीपासून प्रख्यात बेपत्ता 'जय' वाघाचा शोध सुरु आहे, मागील महिन्यात (एप्रिल 2017) जय चा छावा असलेला (श्रीनिवास) T-10 या वाघाचा गळ्यात असलेला 'जीपीएस कॉलर पट्टा' एका नाल्यात मिळाला होता. वाघाच्या गळ्यात नट-बोल्ट नि लावलेला हा 'पट्टा' अखेर निघाल्यास कसा म्हणून बराच गोंधळ उडाला. या वाघाचा घातपात झाल्याचा संशयाला बळ मिळाले 'सोशल मीडिया' वर याबाबत बरीच चर्चा होऊ लागली. माध्यमांनी सुद्धा वनविभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 'जीपीएस' च्या शेवटच्या लोकेशन नुसार शोध मोहीम सुरु झाली आणि सदर 'वाघ' एका शेतात पुरून असल्याची माहिती वनविभागाच्या तपासात उघड झाले. ब्रम्हपुरी वनविभागातील नागभीड रेंज अंतर्गत येणाऱ्या 'कोथुळना' गावातील शेतशिवारात शेतकऱ्याने वन्यप्राणापासून आपले 'उन्हाळी धानाचे' शेतपिक संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या तारेत फसून या वाघाचा मृत्यू झालेला होता. वाघाचा मृत्यू झाल्याने घाबरलेल्या शेतकऱ्याने त्याचा 'बेल्ट' काढून दूरवर एका नाल्यात फेकून वाघाचे शव शेतातच पुरून ठेवले. यात त्याचा उद्देश वाघाला मारण्याचा नसला तरी, शेतपिक संरक्षणाची योग्य उपाययोजना नसल्याने त्याचे हाताने एक गंभीर गुन्हा घडला होता. सदर वाघ जरी 'उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यातील' असला तरी तो बरेचदा ब्रम्हपुरी वनविभागातील वनक्षेत्रपर्यंत प्रवास करायचा, असाच शेतशिवरातून प्रवास करताना सदर घटना घडली होती.
याच महिन्यात काही दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातच चंद्रपूर वनविभाग, चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत 'गोंडसावरी' गावाच्या शेतशिवारात अशाच प्रकारे शेतपिक संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेत अडकून 'तीन रानगवे' मृत्युमुखी पडले होते. शेतकऱ्याने सदर 'रानगवे' वनविभागास माहिती मिळू नये म्हणून जमिनीत पुरून टाकले होते. नंतर पाच दिवसांनी घटना उघडकीस आली.
अश्या वारंवार घडणाऱ्या घटनांमधून परत 'शेतकरी, शेतपिक आणि वन्यप्राणी' या त्रिकोनातून निर्माण होणारा 'मानव-वन्यप्राणी संघर्ष' आणि या परिस्थितीमुळे वन्यप्राण्यांचे जाणारे जीव आणि दुहेरी संकटात सापडणारा शेतकरी यावर कायमस्वरूपी उपाय-योजना महत्वाची आहे तेव्हाच व्याघ्र संवर्धन यशस्वी होईल.
मागील वर्षभरात जर आपण *वनविभाग - वन्यप्राणी - शेतपिक नुकसान - रानडुक्कर मारण्याची मोहीम* याचा विचार केला तर सदर घटनेचे गांभीर्य आपणास लक्षात येईल...
चंद्रपूर जिल्हा व्याघ्र जिल्हा आहे. जिल्ह्यातील सर्वच वनक्षेत्रात वाघाचे अस्तित्व आजघडीला आहे. वाघासोबतच इतर वन्यप्राणी सुद्धा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. जंगलांना लागून असण्याऱ्या शेतशिवारात वाघाचे खाद्य आणि शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या 'रानडुक्कर' ची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
शेतकरी शेतात राब-राबून आपले पीक कसेबसे जगवितो, अस्मानी संकटातून हे पीक वाचले तरी या वनक्षेत्रालागच्या शेतशिवरातील पिकं वन्यप्राण्यांचे बळी पडतात. इथला शेतकरी हवालदिल आहे. शेतपिक नुकसान भरपाई वनविभागाकडून तोकड्या स्वरूपात मिळते. नुकसान भरपाईची प्रकिया करण्यास शेतकरी वर्ग धजावत नसल्याने यावर जालीम उपाय म्हणून शेतीच्या सभोवताल तारेचे कुंपण करून त्यात विद्युत प्रवाह सोडला जातो. यात कधी कधी विद्युत प्रवाह सोडणाराही दगावतो, चुकीने अश्या शेतात जाणारी व्यक्ती सुद्धा दगावते, पाळीव जनावरे मरतात. असे अनेक धोके असताना सुद्धा शेतकरी विद्युत प्रवाह सोडतो. अश्या विद्युत प्रवाहाने कित्येक वेळा वन्यप्राणी मरतात यामुळे कायदेशीर कार्यवाहीस शेतकऱ्यास सामोरे जावे लागते. यावरून उभे पीक वाचविण्याची शेतकरीही धडपड दिसून येते.
"अश्या पद्धतीने अवैधरित्या विद्युत प्रवाह सोडण्याचे कुणीही समर्थन करणार नाही. परंतु, अश्या घटनेत वाघ काय, कुठलेही वन्यप्राणी मारले जाणार नाहीत आणि पिकाचे संरक्षणही झाले पाहिजे याकरीता प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. वन्यप्राणी आणि शेतकरी दोन्ही वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले तरच जिल्ह्यात 'व्याघ्र संवर्धनाची चळवळ' यशस्वी होऊ शकते."
वन्यप्राण्याकडून पाळीव जनावरे मृत्युमुखी होणे...
आज जंगलव्याप्त भागात शेतकऱ्या ची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शेतीच्या कामाकरिता बैलाचा वापर केला जातो. शेतीपूरक उद्योग म्हणून दुभती जनावरे पोसणे, शेणखताचा वापर शेतात करण्याकरिता देखील जनावरे पाळणे हे ही करावे लागते. गाई-म्हशी, बैल, बकऱ्या आदी पाळीव प्राणी शेतालगतच्या जंगलात चरायला नेतात. कधी-कधी वाघाचा वावर असलेल्या क्षेत्रात चरायला गेल्यावर हे पाळीव प्राणी वाघाच्या हल्यात मारले जातात. अशी घटना घडल्यास वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. एखादे भाकड जनावर मेले तर दुःख नाही, परंतु दुभती गाय आणि जोडीचा बैल मारला जातो तेव्हा मात्र या शेतकर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ही घटना शेतीच्या हंगामात झाली तर त्याच्या दुःखास पारावर नसतो. वनविभाग वाघाच्या हल्ल्यात मृत प्राण्याची नुकसान भरपाई अधिकाअधिक १०,००० रुपये देत होती आता, ति वाढवून २०,००० रु करण्यात आलेली आहे. मात्र ती भरपाई तोकडी असते आज चांगली बैलजोडी ४०-५० हजारावर आहे. अशा जोडीतील एक बैल गेला तर दुसऱ्या बैलाची सुद्धा किंमत काहीच नसते. हे नुकसान शेतकऱ्यांसाठी न भरून निघणारे असते. अशा वेळेस सततच्या वन्यप्राण्याकडून होणाऱ्या त्रासामुळे शेतकरी वर्गाचा वन-वन्यप्राण्यासोबतच वनविभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
चंद्रपुर जिल्ह्यात व्याघ्र संवर्धनाकरिता मोठा वाव आहे, वाघ हा जागतिक स्तरावरील संकटग्रस्त राष्ट्रीय प्राणी फक्त ताडोबातच नाहीतर जिल्ह्यात सर्वदूर सुरक्षित जगू शकतो, आणि भविष्यात सुरक्षित राहणार सुद्धा पण, जंगलव्याप्त गावातील शेतकरी बांधव यांच्या वनप्राण्यापासून निर्माण झालेल्या समस्या सुद्धा तेवढयाच ताकदीने सोडविणे गरजेचे आहे.
शेतपीक वाचविण्यासाठी रानडुक्कर मारण्याची मोहीम ...
चंद्रपूर जिल्ह्यातच यापूर्वी शेतकऱ्या ची समस्या लक्षात ठेवून शेतपिक नुकसान करणारी रानडुकरे मारण्याची मोहीम आखून तशी कार्यवाही जिल्ह्यात काही भागात करण्यात आलीं सुद्धा. तसा जुलै 2015 चा शासननिर्णय असला तरी वन्यप्राणीप्रेमी कडून याचा विरोधही झाला. देशपातळीवर विविध राज्यात शेतीस, मनुष्यास धोकादायक म्हणून वेगवेगळ्या राज्यात तेथील राज्य शासनाने नीलगाय, रानडुक्कर, मोर, माकड आदी वन्यप्राणी मारण्याची मोहीम सुरु केलि होती. यावेळी प्रसिद्ध प्राणीप्रेमी केंद्रीय मंत्री मेनका गांधी आणि तत्कालीन केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यांत सदर कार्यवाहीबाबत परस्पर विरोधाचे सूरही उमटले.
मागील वर्षी मुबई उच्च न्यालायाने सदर रानडुक्कर व नीलगाय मारण्याच्या विरोधातील जनहित याचिकेत महाराष्ट्र शासनाच्या वन्यप्राणी मारण्याच्या या कार्यवाहिस स्थगिती दिलेली आहे.
जिल्ह्यात शेतपिक नूकसानीपासून वाचविण्याकरिता उपाययोजना....
चंद्रपूर जिल्ह्यात रानडुक्करा पासून होणाऱ्या शेतपिक नुकसानीबाबत एकाच जिल्ह्यात दोन प्रकारे उपाययोजना करण्यात आल्या...
एक, एखाद्या भागातील रानडुक्कर मारण्याची मोहीम राबविणे तर दुसरी, शेतपिक वाचविण्याकरिता 'सोलर कुंपणाचे' व्यक्तिगत पातळीवर वनविभागाकडून अनुदान तत्वावर वाटप करणे.
यापैकी पहिला उपाय वादग्रस्त ठरला असला तरी रानडुक्कर हा अन्नसाखळीतील एक घटक असून, वाघाचे प्रमुख खाद्य सुद्धा आहे. जंगलालगतच्या शेतशिवरातील शेतपिकास फक्त रानडुक्करच जवाबदार आहे असे नाही तर, इतर तृणभक्षी प्राण्यांपासून सुद्धा शेतपिक नुकसान होत असते. परंतु इतर वन्यप्राणी मारण्याची तशी तरतूदही नाही. तसेच ज्या शेतशिवारालगत रानडुक्कर मारण्याची मोहीम राबविली गेली असेल, त्या भागात पुन्हा दुसर रानडुकरांचा कळप येणार नाही याची शाश्वती देता येत नाही. यामुळे रानडुक्कर मारल्याने त्या भागातील समस्या कायमस्वरूपी निकालात निघेल हा समज चुकीचा आहे.
मग काय शेतपिक वन्यप्राण्यापासून वाचणार नाही काय? हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
परंतु, यावर दुसरा उपाय अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे, व्यक्तिगत पातळीवर 'सोलर ऊर्जा/बॅटरी चलित कुंपण' ताडोबाच्या 'बफर' मध्ये यंदा गावकऱ्यांच्या मागणीनुसार अनुदान तत्त्वावर ह्या सोलर कुंपनाचे वाटप करण्यात येत आहे. सदर उपक्रम 'डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने' अंतर्गत राबविण्यात येत असून जवळपास ५० गावात ६७१ शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर वाटपाचे काम सुरु आहे। मागील वर्षीच्या ताडोबा बफर मधील अडेगांव, मुधोली गावातील शेतकऱ्याच्या अनुभवावरून सदर योजनेस मोठे स्वरूप देण्यात आले।
शेतपिक नुकसानीवर सौर ऊर्जा कुंपण प्रभावी उपाय
शेतपिक नुकसानीच्या समस्यांवर उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी ताडोबा बफर मधील जुनोना, देवाडा तर चंद्रपूर वनविभागातील वरोरा वनपरिक्षेत्रात रामपूर, केम या गावात सामूहिक पद्धतीने सोलर ऊर्जा कुंपण लावण्यात आलेले होते.
सदर सोलर कुंपण योग्य असले तरी याकडे संबधित इको विकास समिति, संयुक्त वनव्यवस्थापन समिति आणि त्या गावातील शेतकऱ्यांनी दुर्लक्ष्य केल्याने, त्याचे निगा न राखल्याने योजना रखडली. हे सामूहिक स्तरावरचे सौर कुंपण अधिक खर्चिक सुद्धा होते. ही योजना अपयशी ठरली तरी, जंगलव्याप्त काहीं भागात व्यक्तिगत पातळीवरचे अवघ्या १०-१२ हजारात येणारे ५-१० एकर पेक्षा जास्त शेताचे संरक्षण करण्यास सक्षम असणारे सोलर कुंपण असल्याची माहिती 'बफर वनविभागातील' मधील गावकऱ्यांनी ताडोबा बफर चे उप संचालक गजेंद्र नरवणे यांना दिली, आणि आम्हाला पुरविण्यात यावी अशी मागणी केली. उप संचालक नरवणे, यांनी मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर अडेगांव, मुधोली मधील निवडक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण पुरविले. या कुंपणाच्या फायद्यामुळे यावर्षी वर्षी शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. यामुळे यंदा बफर मधील ५० गावात 'डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत' भरीव तरतूद करण्यात आली.
आज बफर मधील बरेच गावात या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, या बफर वनक्षेत्रात शेतकरी सुखवलेला दिसत आहे। बफर वनक्षेत्रात पर्यटनातून येणार पैसा जो परत या गावावर खर्च केला जातो तसेच 'डॉ श्यामाप्रसाद जन वन विकास योजने' मुळे सहज शक्य होत आहे. एकंदरीत या बफर मधील गावाचा कायापालट होत आहे ते या वनक्षेत्रातील वन्यप्राण्यामुळेच.
परंतु, नॉन बफर क्षेत्रात शेतपिक नुकसानीचे काय? जे शेतशिवार व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या बाहेर म्हणजेच प्रादेशिक वनक्षेत्रात येतात जे शेतपिक नुकसानीच्या समस्येने ग्रसित आहेत, अशा शेतकरी वर्गासाठी अशी योजना वनविभागाने त्वरित आणून बफर बाहेरील क्षेत्रातील समस्याग्रस्त गावात शेतीला सुद्धा सोलर ऊर्जा/बॅटरी चलित कुंपण अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. वनक्षेत्रालगतच्या सर्वच शेतात वन्यप्राणापासून शेतपिक नुकसानीची समस्या मोठी आहे. त्रासलेल्या शेतकऱ्या कडून चुकीच्या प्रयोगामुळे वन्यप्राणीविरोधी कृति घडेल. अशावेळी वन्यप्राणी संवर्धनाचा दृष्टीने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात शेतपिक नुकसान होणार नाही याकरिता सोलर ऊर्जा कुंपण सारख्या प्रभावी उपाय योजना राबविणे आता क्रमप्राप्त आहे. तेव्हाच वाघ-वन्यप्राणी संवर्धन योग्य रीतीने होईल.
Save Farmer, Save Tiger...
सौर ऊर्जा कुंपणाचे काही फायदेशीर मुद्दे
1. शेतकरी वन्यप्राण्यापासून होणारे शेतपिक नुकसानीच्या समस्येपासून मुक्त होतील.
2.वन्यप्राण्याकडून होणारे शेतपिक नुकसानीची भरपाई देण्याची गरज वनविभागास पडणार नाही.
3. शेतात लावण्यात येणाऱ्या विद्युत् प्रवाहाने वन्यप्राणी मृत्यूच्या घटना घडणार नाहीत.
4. वन्यप्राण्याकडून शेतपिक नुकसानी वाचल्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
5. शेतपिक सुरक्षित राहत असल्याने काही शेतकरी बांधवाना दुबार पीक घेण्याची संधी मिळणार.
6. वाघ - वन्यप्राणी आणि वनविभाग याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत मिळेल. एकंदरीत 'मानव-वन्यजीव संघर्ष' परिस्थिती निवारण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल.
- बंडू सितारामजी धोतरे,
सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ तथा
मानद वन्यजीव रक्षक, जिल्हा चंद्रपूर.