♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


अरुण उमरे

यदाकदाचित जर तुम्ही चंद्रपूर आगाराच्या चंद्रपूर यवतमाळ या सकाळबसनी प्रवास केला असेल तर ही जोडी आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. पंजाबराव जाधव हे या बसचे सारथी(चालक) आणि वाहक आहेत देऊळकरजी. नोकरीच्या निमित्ताने हेटी (कोरपना) येथे अपडाऊन आहे. त्यामुळे मागील चार वर्षापासून या जोडीसोबत माझा अगदी जवळचा संबंध आला आहे. त्यामुळे या जोडीचे अनेक पैलू मला अनुभवता आले आहे.
पंजाबराव जाधव आणि देऊळकरजी हे दोघेही प्रवाशांना चांगली सेवा देत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी त्यांचे चाहते झाले आहेत. पंजाबराव जाधव हे कवी आहेत. विविध विषयांवर त्यांनी शेकडो कविता लिहीलेल्या आहेत. त्यांच्या कविता समाजाला दिशा देण्याचे काम करीत असतात. अलिकडेच पंजाबरावांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कविता लिहिली. त्या कवितेच्या माध्यमातून सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे होणारे हाल यावर पंजाबरावांनी पूरेपूर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा "वर्हाडी झटका व संच" हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते समाजाप्रबोधन करीत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो चाहते त्यांच्याशी जुडलेले आहेत. त्यामुळे चंद्रपूर ते यवतमाळ या बसप्रवासात शेकडो चाहते त्यांना नमस्कार करतात. त्यामध्ये मी सुद्धा त्यांचा एक चाहता आहे.
वाहक देऊळकरजी हे सुद्धा प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देत आहे. आज आपण पाहतो की प्रवासादरम्यान प्रवाशी आणि वाहकाचे सुट्या पैशावरून वाद होतांना नेहमी बघतो. पण या बाबीला मात्र देऊळकरजी अपवाद आहेत. ड्युटी सुरू होण्यापूर्वीच वाहक देऊळकरजी स्वतःच सुट्या पैशांची व्यवस्था करतात. त्यामुळे उभ्या आयुष्यात त्यांना कधीही सुट्या पैशाची चणचण जाणवली नाही. त्यांचे स्मरण एवढे जबरदस्त आहे की कोणता प्रवासी कुठे उतरणार आहे, याची त्यांना पुरेपूर माहिती असते. त्यामुळे प्रवाशांना न विचारता तेच बेल मारुन बस थांबवतात आणि त्यांना सन्मानाने उतरवतात. प्रवाशांना सौजन्यपूर्वक वागणूक देतात. खरच देऊळकरजींचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
चालक पंजाबराव जाधव आणि वाहक देऊळकरजी यांची केमेस्ट्री चांगली जमली आहे. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. आम्ही तिघेही बसजवळ उभे होतो. तेवढ्यात एक प्रवासी आमच्याकडे आला. माझा एक नातेवाईक मरण पावला आहे. त्यांचा अंतिमसंस्कार आहे. त्यामुळे आपण वणीचे तिकीट घ्या. आणि मला सावर्ला येथे उतरवून द्या, अशी विनंती त्या प्रवाशाने केली. त्या प्रवाशाला सावर्ला या गावाची कल्पना नव्हती. तरीही देऊळकर यांनी बेल वाजविली आणि पंजाबरावांनी सावर्ला येथे बस थांबवून सन्मानाने त्या प्रवाशाला उतरवून दिले. हे एक प्रातिनिधीक उदाहरण झाले. अशाप्रकारच्या या जोडीने आतापर्यंत प्रवाशांना अनेक सेवा दिलेल्या आहेत.
या जोडीच्या बाबतीत अलिकडेच घडलेला एक प्रसंग आहे. एक म्हातारी बाई बसने प्रवास करीत होती. ती खिडकीजवळ बसली होती. यवतमाळची तिकीट काढण्यासाठी तिने पाचशे रुपयाची नोट काढली. तिकीट काढत असतांना अचानक पाचशे रुपयाची नोट खिडकीतून बाहेर उडाली. त्यामुळे ती म्हातारी बाई रडू लागली. आणि नोट उडाल्याची माहिती देऊळकर यांना दिली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बेल मारली. आणि लगेच पंजाबरावांनी बसचा ब्रेक मारुन बस थांबविली. खाली उतरून दोघेही काही प्रवांशाना सोबत घेऊन त्या म्हातारीची नोट शोधू लागले. पायदळ चालत अर्धा किलोमीटरपर्यंत नोट शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ती पाचशे रुपयाची नोट काही मिळाली नाही. त्यामुळे ती म्हातारी पुन्हा रडू लागली. यावर पंजाबराव जाधव यांनी समयसुचकता साधत आपल्या जवळचे पन्नास रुपये दिले. वाहक देऊळकर यांनीही मदतीचा हात दिला. आणि या दोघांनीही प्रवाशांना आपआपल्या परीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहानाला 'ओ' देत प्रवाशांनी तब्बल चारशे दहा रुपयाची रक्कम गोळा केली. आणि सदर गोळा झालेली रक्कम त्या महिलेला भेट दिली. आणि क्षणात त्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू आले. या उदाहरणावरून असे दिसून येते की या दोघांचेही कार्य खरच महान आहे.
समाजसेवेसोबतच ही जोडी चंद्रपूर आगाराला भरघोस उत्पन्न मिळवून देण्याचे काम करीत आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासन्याचा प्रयत्न करीत आहे. या जोडीला माझा मानाचा मुजरा.
निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या या जोडीच्या कार्याची एसटी महामंडळाने दखल घ्यायालाच हवी, असे मनस्वी वाटते.
- अरुण उमरे