वाट घाटाची ही दूर जाते
माझ्या माहेराच्याच गावा
जिथे थकल्या मनालाही
मिळे आईकडेच विसावा
माझ्या माहेरच्या परसात
गोठा गाईगुरे खिल्लारांचा
दुधातुपाची चंगळ माहेरी
नाद घुंगुरमाळा या गुरांचा
मळा फुललाय हा झोकात
माय माझी रांधती दिनरात
वृद्ध बाप पोशिंदा जगाचा
राबतो खपतो तो शिवारात
पाहूण्यांचे माहेराच्या घरी
कोडकौतुक नित्यच होई
माय माझी अन्नपुर्णेवाणी
नाही ऋण सावकारी डोई
माझ्या माहेरच्या अंगणात
जमे सोयऱ्यांचा गोतावळा
मैफिल गप्पांची मौजमस्ती
एकमेकांचा असे कळवळा
अंगणी माझ्या माहेराच्या
वारा समाधानाचाच वाही
ऐश्वर्य सुबत्ता शांति घरात
जणू डोळे भरूनीच पाही
तुळशीवृंदावन अंगणात
सुटे मंजूळांचा घमघमाट
सायंदीप तेवताना असतो
कंकणाचाच किनकिनाट
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835
Twitter
Facebook
Digg
Delicious
Stumble